Homeकोपरगाव"जनतेची भाषा ही शासन व्यवहाराची भाषा असली पाहिजे": - श्री. संदीप साबळे

“जनतेची भाषा ही शासन व्यवहाराची भाषा असली पाहिजे”: – श्री. संदीप साबळे

भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलींचा जागर उपक्रम संपन्न

कोपरगाव, दि. – “जनतेची भाषा हीच शासन व्यवहाराची भाषा असली पाहिजे. मराठी भाषेचा वापर प्रशासन, शिक्षण व व्यवहारात प्रभावीपणे होणे आवश्यक आहे.”असे प्रतिपादन श्री. संदीप साबळे यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालय मुंबई आणि श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथील भाषा विभाग, सांस्कृतिक विभाग, वाड्मय मंडळ आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बोलींचा जागर उपक्रम उद्घाटन समारंभ निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी भूषविले. या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. अॅड. भगीरथकाका शिंदे तसेच अध्यक्ष, मराठी भाषा समिती (महाराष्ट्र शासन) व रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीचे चेअरमन मा. आमदार श्री. आशुतोषदादा काळे यांनी शुभेच्छा संदेश पाठवले.

भाषा संचालनालयाच्या कार्याचा आढावा घेताना श्री. साबळे यांनी शास्त्रीय विषयांसाठी मराठी परिभाषा निर्मिती, भारतीय संविधानाची मराठी व द्विभाषिक आवृत्ती, कायद्यांचे मराठी अनुवाद तसेच ‘शासन शब्दकोश’ मोबाईल ॲप यांसारख्या उपक्रमांची माहिती दिली. मराठी भाषेच्या प्रचार- प्रसारासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांत विविध उपक्रम राबवले जात असून, यावर्षी ‘बोलींचा जागर’ उपक्रमातून बोलीभाषांचे जतन व संवर्धन साधले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. ह. म. सूर्यवंशी (सहाय्यक भाषा संचालक, नाशिक विभाग) यांनी भाषा संचालनालय राज्यभर शास्त्रीय परिभाषा निर्मिती, अनुवाद व बोलीभाषा संवर्धनासाठी सक्रियपणे कार्यरत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात शोभायात्रा व ग्रंथदिंडीने झाली. उद्घाटनानंतर विविध बोलींवर आधारित व्याख्याने तसेच लोककला व लोकसाहित्याचे सादरीकरण करण्यात आले. डॉ. चिंतामण धिंदळे यांनी कातकरी बोली, तर मा. श्री. काकासाहेब वाळुंजकर व प्रा. संतोष पवार यांनी नगरी बोलीतील उच्चारण प्रक्रिया, ढब व व्याकरणिक भेद यांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली. कवी श्री. नामदेव कोळी, यांनी ‘तो शेतकऱ्याचा मुलगा’ ही कविता सदर केली.भारुडकर श्री. भानुदास बैरागी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बोलीभाषेतील भारुडांच्या सादरीकरणातून लोककलेची समृद्ध परंपरा अधोरेखित केली.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “मराठी भाषेच्या बोली म्हणजे आपल्या सांस्कृतिक परंपरेचा जिवंत वारसा असून, भाषिक अस्मिता, नैतिक मूल्य त्यांचे जतन व संवर्धन ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये भाषिक जाणीव व अभिमान निर्माण होतो,” असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक,स्वागत आणि पाहुण्यांचा परिचय डॉ.संतोष पवार यांनी केले. सदर कार्यक्रमास अनुवादक श्री. रुपेश मोरे, बालकवयित्री कु. रेवती चव्हाण, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य श्री. संजय शिंदे, प्रा. उज्ज्वला भोर, प्रा. किरण पवार, डॉ.प्रमोद चव्हाण, डॉ. रावसाहेब दहे, कार्यालय अधीक्षक श्री. सुनील गोसावी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सीमा दाभाडे व डॉ. भागवत देवकाते यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. माधव यशवंत यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!