
कोपरगाव :- मानवजातीच्या प्रगतीच्या प्रवासात मटेरियल सायन्स आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचे मोठे योगदान आहे. औद्योगिक क्रांतीची सुरुवात वाफेच्या शोधाने झाली आणि उत्पादन व वाहतूक क्षेत्रात मोठा बदल घडून आला. त्यानंतर जैविक ऊर्जेचा वापर आणि विजेच्या शोधामुळे मानवी जीवन अधिक गतिमान झाले. पुढे इलेक्ट्रॉनिक्सच्या शोधाने संप्रेषण व यांत्रिकी क्षेत्रात क्रांती घडवली. १९६३ च्या सुमारास संगणकाच्या विकासामुळे डिजिटल विज्ञानाची सुरुवात झाली आणि संगणकाच्या माहिती प्रक्रिया करण्याच्या क्षमतेत मोठी वाढ झाली. त्यामुळे ज्ञानाच्या कक्षा अधिक विस्तारल्या. आज मटेरियल सायन्सच्या साहाय्याने फायबर व नॅनो -पार्टिकल्ससारख्या अत्याधुनिक पदार्थांची निर्मिती होत असून आरोग्य, उद्योग, संप्रेषण व संशोधन क्षेत्रात त्यांचा प्रभावी वापर होत असल्याचे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा येथील कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले.
रयत शिक्षण संस्था संचलित श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन व नवोपक्रमांवर आधारित “ACRIST-2026” ही दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा येथील कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर उपस्थित होते.
कुलगुरू पंडित विद्यासागर यांनी उच्च शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, उच्च शिक्षण विद्यार्थ्यांच्या भविष्यास सुरक्षित दिशा देण्याबरोबरच त्यांच्यात संशोधनाची आवड निर्माण करते आणि नवीन ज्ञान व कौशल्ये आत्मसात करण्याची क्षमता विकसित करते. तसेच वेळेचे व्यवस्थापन, स्वअनुशासन, जटिल ज्ञान समजून घेण्याची क्षमता आणि नव्या तंत्रज्ञानाच्या विकासात योगदान देण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये विकसित होते. ‘माइंड’ म्हणजे विचार, जाणीव, कल्पनाशक्ती, आकलन, बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता आणि स्मरणशक्ती यांचा समुच्चय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षणाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा असून ‘Learning to know, Learning to do आणि Learning to live together’ या तत्त्वांवर आधारित शिक्षणव्यवस्था समाजनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावते, असे त्यांनी नमूद केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “कार्यशाळेचे प्रास्ताविक करत परिषदेचा उद्देश विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या संशोधनाला चालना देणे व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे हा असल्याचे स्पष्ट केले”. यांनी केले यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. निलेश मालपुरे यांनी करून दिला. सदर कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभासाठी प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, मा.श्री. प्रांजल चित्ते (नाशिक), मा.श्री.संतोष शिंदे (कोल्हापूर), मा. डॉ. सचिन रौंदिया (बेंगलोर), डॉ. कृतिक पी. एस.(बेंगलोर), मा. श्री. पराग मोरे (मुंबई), मा. डॉ. सुभाष बेंद्रे (जळगाव) यांसह विषयतज्ञ व अभ्यासक यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. चेतना काळे, प्रा. प्रियांका पवार व प्रा. श्रुती पाटील यांनी केले, तर आभार विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत यांनी मानले.