
कोपरगांव : – राज्यातील सर्व अखिल गुरव समाज बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय अध्यक्ष विधीज्ञ अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील आझाद मैदानावर १७ मार्च रोजी सकाळी १० वाजता उपस्थित रहावे असे आवाहन अखिल गुरव समाज संघटना देवस्थान इनाम वर्ग ३ वतन जमिन महाराष्ट्र राज्याचे सचिव व कोपरगांव कचेश्वर मंदिर देवस्थानचे पुजारी रमेश क्षीरसागर यांनी केले आहे.
त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात महटले आहे की, अखिल गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्याच्या पाठपुराव्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शासन दरबारी सातत्यांने प्रयत्न केले. इनाम वर्ग ३ व भोगवटा वर्ग २ शेतकरी वहिवाटदार बांधवांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपसातील मतभेद बाजुला ठेवुन सर्वांनी विराट संख्येने १७ मार्च रोजी आझाद मैदान मुंबई येथे ताकद दाखवुन द्यावी. वर्षानुवर्षे वंशपरंपरेने वाहिवाट करणा-या गुरव (पुजारी) समाजाकडे ईनाम वतन जमीनी आहेत मात्र त्या त्यांना न्याय हक्काने मिळत नसल्याने परिणामी अन्य शासन सोयी सुविधांच्या लाभापासून गुरव समाज बांधवांना वंचित रहावे लागत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आण्णासाहेब शिंदे यांनी सातत्यांने विविध मागण्याचा पाठपुरावा शासन दरबारी केला आहे. गुरव समाजाच्या सर्व मागण्या प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यासाठी सर्वांनी एकजुट दाखवावी असे आवाहनही रमेश क्षीरसागर यांनी केले आहे.