Homeकोपरगावकोयटे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न

कोयटे विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्था संचलित स्व. दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व बाल आनंद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यावहारिक ज्ञान यांचा संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली होती.

या कार्यक्रमास कोपरगाव नगरपालिका विद्यमान नगरसेविका सौ. गौरी पहाडे, सौ. सोनाली कपिले, माजी नगरसेवक मंदार पहाडे तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीप कपिले, समता इंटरनॅशनल स्कूल कार्यकारी विश्वस्त सौ. स्वाती कोयटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. समता परिवाराचे सर्वेसर्वा ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. शालेय व्यवस्थापन समिती प्रमुख सौ. सुहासिनी कोयटे यांनी प्रास्ताविक करत वार्षिक अहवाल सादर केला.

यावेळी स्वाती कोयटे यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, सौ. सुहासिनी कोयटे या गेल्या २७ वर्षांपासून सासरे दादाप्पा खंडाप्पा कोयटे यांच्या नावाने शाळा सुरू करून अनेक विद्यार्थी घडवत आहेत. विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम त्या कोयटे विद्यालयात सातत्याने राबवित असून त्यामुळे हे विद्यालय विद्यार्थी केंद्रित शाळा म्हणून शहरात ओळखले जाते. कोयटे विद्यालयाच्या प्रगतीसाठी कोयटे परिवाराचेही त्यांना नेहमी सहकार्य लाभत असते.

वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू आणि पंजाब या राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या गीतांवर आकर्षक सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कला गुणांना वाव देत आर्थिक व्यवहाराचे प्राथमिक धडे ही आत्मसात केले.

यावेळी माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गेल्या २७ वर्षांपासून निवारा परिसर व आजूबाजूच्या भागातील विद्यार्थ्यांना कोयटे विद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना अल्प शुल्कात शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कोयटे परिवार करत असून, परिसरात शैक्षणिक तसेच धार्मिक, सांस्कृतिक वातावरण निर्माण केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते संदीप कपिले यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, या विद्यालयातील विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील असले तरी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले जातात. सौ. सुहासिनी कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले जात असून ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. तसेच कार्यक्रमासाठी आमंत्रित करून विद्यार्थ्यांचे कलागुण पाहण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी काका कोयटे व सौ.सुहासिनी कोयटे यांचे आभार मानले. यावेळी विद्यमान नगरसेविका गौरी पहाडे व सोनाली कपिले यांनीही मुलांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभावरी नगरकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिक्षिका मनीषा कांबळे यांनी मानले. यावेळी सुरेंद्र व्यास, सौ. मीनाताई व्यास, ज्योत्स्ना पटेल, शोभा भावसार, सुनंदा भट्टड, माई कर्डक आदींसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!