
कोपरगाव : सहकारी पतसंस्था चळवळ सक्षम करण्यासाठी काका कोयटे यांनी आयुष्य वाहून घेतले असून त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळीला बळ मिळाले आहे. ही चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून महाडिक कुटुंबीय निश्चितपणे प्रयत्न करतील, असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित कोल्हापूर येथील राज्यस्तरीय सहकारी पतसंस्था चळवळीतील महिला मेळाव्यात ते बोलत होते.

काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळ अधिक बळकट होत असून सर्वसामान्य नागरिकांचा पतसंस्थांवरील विश्वास त्यांच्या प्रयत्नांमुळे वृद्धिंगत होत आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक प्रलंबित प्रश्न सरकारी दरबारी मार्गी लागले आहेत. या चळवळीला अधिक बळ देण्यासाठी महाडिक कुटुंबीयही सक्रियपणे सहभागी होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून पतसंस्थांचे प्रश्न दिल्लीपातळीवर मांडले जाणार असून सहकार क्षेत्राला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील, असे आश्वासन सौ. अनुराधाताई महाडिक यांनी आपल्या भाषणादरम्यान दिले.
या मेळाव्यात सौ.अरुंधतीताई महाडिक यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या महिला विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कृष्णराज महाडिक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सहकारी पतसंस्थांच्या कायद्यात महिलांसाठी आवश्यक बदलांविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी सौ. अरुंधती धनंजय महाडिक होत्या. व्यासपीठावर नांदेड येथील गोदावरी अर्बनच्या सौ. राजश्रीताई पाटील, राज्य फेडरेशनच्या उपकार्याध्यक्षा अंजलीताई पाटील, पुनम चव्हाण तसेच क्रांतीताई शितोळे उपस्थित होत्या.
खासदार धनंजयराव महाडिक यांनी यावेळी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्रातील बदलांसाठी नेमलेल्या समितीवर सदस्य म्हणून काम करताना राज्यातील पतसंस्थांच्या समस्या व सूचना प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तर नवनियुक्त राज्य फेडरेशन महिला विभागाच्या अध्यक्ष सौ. अरुंधतीताई महाडिक म्हणाल्या की, काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली सहकारी पतसंस्था चळवळीला नवे बळ मिळत आहे. या चळवळीला महिलांची अधिक साथ मिळावी यासाठी राज्यभर महिला पतसंस्थांचे जाळे मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून काका कोयटे यांच्या कार्याला पूर्ण पाठिंबा देणार आहोत.