
पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी सदैव खंबीरपणे उभी आणि सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य देणारी एकमेव संघटना
कोपरगाव : पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी, उपस्थित प्रश्नांसाठी आणि अडिअडचणींच्या काळात एकमेकांना मदतीचा हात देत सदैव पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेची कोपरगाव तालुका व शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. संघटनेचे राज्य अध्यक्ष निलेश सोमानी, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल कोळसे व जिल्हा निवड समिती अध्यक्ष सोमनाथ काळे यांच्या आदेशान्वये जिल्हा सरचिटणीस जनार्दन जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवनिर्वाचीत तालुकाध्यक्ष पत्रकार प्रा. विजय कापसे सर यांनी नुतन कार्यकारिणीची दि.१४ऑगष्ट रोजी घोषणा केली.

ज्येष्ठ पत्रकार व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी तालुका व शहर कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये तालुका उपाध्यक्ष पदी निवृत्ती शिंदे, तालुका कार्याध्यक्ष पदी किसन पवार, सचिव पदी विनोद जवरे, शहराध्यक्ष पदी हाफिज शेख, शहर उपाध्यक्ष पदी रवी वाघडकर, शहर कार्याध्यक्ष पदी स्वप्निल कोपरे, तालुका संघटक पदी सोमनाथ डफळ, शहर संघटक पदी संजय लाड, तालुका खजिनदार पदी अमोल गायकवाड, तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी विशाल लोंढे, सल्लागार पदी काका खर्डे व दिनेश जोशी, संपर्कप्रमुख पदी राजेंद्र तासकर यांची निवड करण्यात आली. तसेच ज्येष्ठ सदस्य म्हणून फकीरराव टेके, सतीश जाधव, मिलिंद विघे, प्रमोद पवार यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस जनार्दन जगताप नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, “महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना ही केवळ पत्रकारांच्या प्रश्नांपुरती मर्यादित न राहता सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही सातत्याने कार्य करणारी संघटना आहे. पत्रकारांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना नेहमीच पुढाकार घेते. आगामी काळात कोपरगाव तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक मजबूत करून पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने काम करण्याचा सल्ला देत” सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संघटनेची शिस्त, प्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी जपत प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
तर तालुकाध्यक्ष विजय कापसे यांनी बोलताना सांगितले की,“वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सर्व पत्रकार बांधवांची साथ घेऊन आगामी काळात संघटनेचे कार्य अधिक व्यापक करत पत्रकारांच्या अडचणी, प्रश्न व हक्कांसाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील राहील. पत्रकारांच्या हितासोबतच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व जनजागृतीचे विविध उपक्रम तालुकाभर राबविण्याचा आमचा संकल्प आहे. संघटनेत प्रत्येक पत्रकाराला सन्मानाचे स्थान देत सर्वांना सोबत घेऊन एकजुटीने काम केले जाईल तर पत्रकारांमध्ये एकोपा वाढविणे, नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करणे, पत्रकारांसाठी विविध उपक्रम राबविणे तसेच समाजातील सकारात्मक व जनहिताच्या विषयांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, यासाठी संघटना आगामी काळात विशेष प्रयत्न करणार असल्याचेही प्रा कापसे यांनी सांगत सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
बैठकीचे सूत्रसंचालन सचिव विनोद जवरे यांनी केले, तर कार्याध्यक्ष किसन पवार यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.