
कोपरगाव : वनिता मंडळाच्या वतीने ओम शांती, प्रजापिता ब्रह्माकुमारीज सेंटर येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय, आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
याप्रसंगी सरला दीदींनी माऊंट अबू येथून आणलेल्या ‘रक्षा कवच’ राख्या वनिता मंडळाच्या सर्व भगिनींना प्रेमपूर्वक बांधल्या. त्यानंतर सरला दीदींचे अत्यंत सुंदर, प्रेरणादायी व संस्कारमय प्रवचन झाले.
आपल्या प्रवचनातून दीदींनी “प्रत्येक स्त्री आपल्या घराला स्वर्ग बनवू शकते” हा अत्यंत सुंदर संदेश दिला. स्वयंपाक करताना अन्नपूर्णा मातेला वंदन करून, प्रेम आणि सकारात्मक भावनेने अन्न तयार करावे, कारण त्या अन्नातून घरातील प्रत्येक व्यक्तीवर संस्कार होत असतात, असे सांगितले.
घरातील वातावरण प्रेममय, आनंदी आणि सकारात्मक कसे ठेवावे, मुलांना चांगले संस्कार कसे द्यावेत आणि आपल्या विचारांनी व आचरणाने संपूर्ण कुटुंबात सुख – शांती कशी निर्माण करावी, याविषयी त्यांनी अतिशय हृदयस्पर्शी मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थित भगिनींना आपल्या कुटुंबातील भूमिकेकडे एका नव्या आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाली. राखी बांधल्यानंतर सर्वांना प्रसाद देण्यात आला. स्नेह, आनंद आणि आध्यात्मिक वातावरणाने भारलेल्या या सोहळ्याची सांगता झाली.
या कार्यक्रमातून उपस्थित सर्व भगिनींना अतिशय सुंदर, शांत आणि दिव्य अनुभूती अनुभवायला मिळाली.
वनिता मंडळाच्या अध्यक्षा सौ. वृंदा कोऱ्हाळकर यांच्या प्रेरणेतून या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास वनिता मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांसह कार्यकारिणी सदस्य व मोठ्या संख्येने भगिनी उपस्थित होत्या.
या सुंदर व दिव्य सोहळ्यासाठी सरला दीदी तसेच ओम शांती केंद्रातील सर्व ब्रह्माकुमारी भगिनींचे मनःपूर्वक आभार. त्यांच्या प्रेमळ मार्गदर्शनातून सर्वांना आध्यात्मिक आनंदासोबतच कुटुंब आणि संस्कार याविषयी मौल्यवान विचारांची शिदोरी मिळाली.
“प्रेम, पवित्र विचार आणि संस्कारांनी प्रत्येक स्त्री आपल्या घराचे स्वर्गात रूपांतर करू शकते.”
🀠 ॥ ॐ शांती ॥