
शिर्डीत १८ राज्यांतील सुमारे ३०० खेळाडूंचा सहभाग
कोपरगाव :- इंडो अँमॅच्युअर गो असोसिएशन आणि गो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या राष्ट्रीय गो स्पर्धा २०२६-२७ चा भव्य शुभारंभ मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी श्री साईबाबा ज्युनियर कॉलेज, शिर्डीच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेत देशभरातील १८ राज्यांमधून सुमारे ३०० मुले व मुली खेळाडू सहभागी झाले असून, ज्युनियर, सब-ज्युनियर आणि सिनियर अशा विविध गटांमध्ये खेळाडू आपल्या बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि कौशल्याची कसोटी पाहत आहेत. देशाच्या विविध भागांतून खेळाडू, प्रशिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाल्याने स्पर्धेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी श्री. गोरक्ष गाडिलकर यांनी गो स्पोर्ट्स या खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “खेळामुळे व्यक्ती केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम होत नाही, तर मानसिकदृष्ट्याही निरोगी आणि सक्षम बनते. गो हा बुद्धिमत्ता, एकाग्रता, संयम आणि रणनीतीचा खेळ असून, खेळाडूंना जीवनात पुढे जाण्याची मोठी संधी या खेळातून मिळू शकते.”
खेळाडूंना शुभेच्छा देताना त्यांनी प्रत्येकाने पूर्ण मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाने खेळावे, तसेच भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करून भारताचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.
तीन हजार वर्षांचा प्राचीन बौद्धिक खेळ
गो स्पोर्ट्सच्या इतिहासाचा संदर्भ देताना गाडिलकर यांनी सांगितले की, गो हा सुमारे तीन हजार वर्षे जुना बौद्धिक खेळ असून, आज जगातील जवळपास ९८ देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. बदलत्या काळानुसार या खेळाची लोकप्रियता वाढत असून भारतातही गो स्पोर्ट्सला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
ऑलिम्पिक आणि एशियाडमध्ये समावेशासाठी प्रयत्न
इंडो अँमॅच्युअर गो असोसिएशनचे प्रशासकीय सचिव श्री. चंदन पांडे यांनी गो स्पोर्ट्सची आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाटचाल आणि भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची माहिती दिली. ते म्हणाले की, “गो खेळ नवनवीन उंची गाठत आहे. याच वर्षी झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी तीन रौप्यपदके आणि एक कांस्यपदक मिळवून देशाचा गौरव वाढविला आहे.”

गो खेळाचा क्रीडा धोरणात समावेश करण्याबरोबरच ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये (एशियाड) गो स्पोर्ट्सचा नियमित समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही पांडे यांनी सांगितले. भारतातील युवा खेळाडूंमध्ये या खेळाची आवड वाढत असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कामगिरी आणखी उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील खेळाडूंना व्यासपीठ
गो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव श्री. अनिल सहारे यांनी प्रास्ताविक करताना राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश आणि गो स्पोर्ट्सच्या प्रसारासाठी महाराष्ट्रात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. देशभरातील खेळाडूंना एकत्र आणून त्यांना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी गो अहिल्यानगर असोसिएशनचे श्री. मकरंद को-हाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. राजेंद्र कोहकडे यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले.
शिर्डीच्या विद्यार्थ्यांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम
राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे शिर्डी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेला बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम. विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेची ओळख उपस्थित खेळाडू व पाहुण्यांना करून दिली. विविध राज्यांतून आलेल्या खेळाडूंनी या सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली.
या राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने शिर्डीमध्ये देशाच्या विविध भागांतील खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमी एकत्र आले असून, गो स्पोर्ट्सच्या माध्यमातून बुद्धिमत्ता, एकाग्रता, संयम आणि रणनीती यांचा संगम घडविणाऱ्या या खेळाला महाराष्ट्रात तसेच देशभरात नवे व्यासपीठ मिळत आहे.
यावेळी इंडो अँमॅच्युअर गो असोसिएशनचे प्रशासकीय सचिव चंदन पांडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष व आयोजन सचिव तथा महाराष्ट्र गो असोसिएशनचे सचिव अनिल सहारे, भारतीय गो महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय महापात्र, इंडियन फ्लोअरबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव रविंद्र चौथवे, ओडिशाचे महासचिव राजकिशोर मोहंती, आंध्र प्रदेशचे महासचिव प्रसाद, हरियाणाचे महासचिव जगदीश असिजा, महाराष्ट्राचे सहसचिव दीपक वाडे, बिहारचे डॉ. बृजेश आणि राजेश सलूजा यांच्यासह विविध राज्यांतून आलेले पदाधिकारी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.