
कोपरगाव:-जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर व तालुका क्रीडा समिती कोपरगाव व एस.एस.जी. एम कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने 19 वर्षाआतील तालुकास्तरीय शालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा 19 ते 21 सप्टेंबर, 2026 दरम्यान एस. एस. जी.एम च्या मैदानावर आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत समता इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेज, के.जे. सोमैय्या कॉलेज, संजीवनी ज्युनिअर कॉलेज, सोमय्या विद्यामंदिर साकरवाडी, महर्षी संत जनार्दन स्वामी ज्युनिअर कॉलेज, आत्मा मालिक इंग्लिश मीडियम ज्यूनिअर कॉलेज, आत्मा मालिक सी. बी. एस. ई ज्यूनिअर कॉलेज, आत्मा मालिक उच्च माध्यमिक ज्युनिअर कॉलेज, कोकमठाण आणि एस. एस. जी. एम कॉलेज, कोपरगाव अशा एकूण 9 संघांनी सहभाग घेतला. एस. एस. जी. एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी उदघाटन प्रसंगी खेळाडूना संघभावना व खिलाडूवृत्ती जोपासण्याचे आव्हान केले.

दि.21 सप्टेंबर सोमवार रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना एस. एस. जी. एम कॉलेज कोपरगाव व आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण या दोन तुल्यबळ संघात झाला. एस. एस. जी. एम ने नाणेफेक जिंकून आत्मा मालिकला प्रथम फलंदाजीचे आव्हान दिले. प्रथम फलंदाजी करताना आत्मा मालिकने 8 षटकात 6 गडी बाद करत 45 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल एस.एस.जी.एम संघाने 6.3 षटकात 7 गडी राखून 46 धावा पार करत. सलग दुसऱ्या वर्षी 19 वर्षाआतील तालुकास्तरीय शालेय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. संदीप वर्पे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना विजेत्या संघातील खेळाडूंनी जिल्हा स्तरावरील स्पर्धेत देखील अशीच कामगिरी करावी, तसेच खेळाबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेत देखील भरीव कामगिरी करावी, असे प्रतिपादन केलें तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे, सीनियर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री. रविंद्र हिंगे, पर्यवेक्षक श्री. माधव रेवगडे, तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री. नितीन निकम तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक श्री. सुनील कदम, क्रिकेट मार्गदर्शक श्री. संदीप शिंदे, श्री. सुनील चव्हाण क्रिकेट समालोचक संतोष विधाटे तसेच आत्मा मालिकचे संदीप बोळीज, श्री. प्रशांत शर्मा इ. उपस्थित होते. ॲड. संदीप वर्पे यांचे हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघास ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. प्राचार्य तसेच सर्व महाविद्यालयीन विकास समिती सदस्यांच्या वतीने खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.