Homeकोपरगावकोपरगावचा पाणीप्रश्न सुटल्याचा नुसताच आभास, आ. आशुतोष काळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी चुकीचा...

कोपरगावचा पाणीप्रश्न सुटल्याचा नुसताच आभास, आ. आशुतोष काळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी चुकीचा प्रचार थांबवावा_भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले.

संपादक – राजेंद्र तासकर

      आमदार आशुतोष काळे यांच्या निष्क्रियतेमुळे कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न भिजत पडला असून,आपले अपयश झाकण्यासाठी ते भुलभलैय्या करून जनतेला संभ्रमित करत आहेत.येसगावच्या 5 नंबर साठवण तलावाचे काम अजून सुरू झालेले नाही.खोट्या बातम्या देऊन शहराचा पाणीप्रश्न कायम स्वरूपी सुटला,असे खोटे सांगून आ.काळे हे जनतेला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत आहेत, पण कोपरगावची जनता मूर्ख नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे आणि हा अपप्रचार थांबवावा, असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष डी.आर.काले यांनी दिला आहे. 
            डी.आर.काले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव नगरपालिकेच्या येसगाव येथील 5 नंबर साठवण तलावासाठी आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेसाठी 131 कोटी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर करवून आणला.या निधीतून 5 नंबर साठवण तलावाचे काम सुरू झाले असून, त्यामुळे शहरवासियांना भविष्यात मुबलक पाणी मिळणार आहे, असे आ.आशुतोष काळे सांगत आहेत,परंतु 5 नंबर साठवण तलावाचे काम प्रत्यक्षात अजून सुरू झालेले नाही.असे असतानाही आ.काळे आणि त्यांचे समर्थक आगामी नगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केवळ पाणी वितरण व्यवस्थेचे काम सुरू केल्याचे खोटे सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत.शहरात पाईपलाईन आणि टाकीच्या कामाचे भूमिपूजन केले म्हणजे पाणीप्रश्न कायमचा सुटला असे नाही.कोणत्याही कामाचे श्रेय लाटण्याच्या अट्टहासापोटी आ. काळे यांच्याकडून हा अपप्रचार सुरू आहे.आ.काळे यांनी शहर वासियांना 5 नंबर साठवण तलावाचे व पाणीप्रश्नसोडविण्याचे गाजर दाखवून 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली, पण गेल्या तीन वर्षांत शहराचा पाणीप्रश्न सुटलेला नाही.आता मात्र ते अपप्रचार करून जनतेप्रति खोटा कळवळा दाखवत आहेत.

    कोपरगाववासियांना दररोज हवे शुद्ध आणि मुबलक पाणी

कोपरगाव शहराला गेल्या पाच वर्षापासून आठ दिवसांतून फक्त एकदा पाणीपुरवठा होत आहे. गोदावरी कालव्यातून मिळणारे हे पाणी दूषित असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कोपरगावला पाणीपुरवठा होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणाच्या क्षेत्रात यावर्षी मुबलक पाऊस झाल्याने धरण ओव्हर फ्लो झाले.त्यामुळे आता दररोज शुद्ध व पुरेसे पाणी मिळावे,अशी कोपरगाववासियांची मागणी आहे आणि ती रास्तच आहे,परंतु दररोज पाणी देण्याच्या या मागणीकडे दुर्लक्ष करून आ. काळे हे आता रविवार (31 जुलै) पासून शहराला चार दिवसांआड पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगून आपलेच म्हणणे पुढे रेटत आहेत.5 नंबरचा साठवण तलाव होऊ नये आणि कोपरगावचा पाणीप्रश्न सुटू नये,असे आम्हाला अजिबात वाटत नाही,पण 5 नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण झाल्यावर कोपरगावकरांना खरोखरच दररोज शुद्ध आणि मुबलक पाणी मिळणार आहे का, हा आमचा सवाल आहे.5 नंबर साठवण तलावाच्या कामाच्या नावाखाली शहराचा पाणीप्रश्न सुटल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला आमचा विरोध आहे.
5 नंबर तलावाच्या कामाच्या मंजुरीसाठी लागणारे सर्व ठराव नगरपालिकेत भाजप-शिवसेना- रिपाइंच्या नगरसेवकांनी बहुमताने मंजूर केलेले आहेत.त्यामुळेच ही योजना शासनाकडे मंजुरीसाठी पाठवता आली.त्यावेळेस आ. काळे यांचा पालिकेतील गट अल्पमतात होता.कोपरगाव शहराच्या पाणीप्रश्नासाठी तत्कालीन नगरसेवकांनी 5 नं. साठवण तलाव आणि निळवंडे पाईपलाईन योजना मंजूर करावी, असा ठराव केलेला आहे. तत्कालीन नगरसेवकांनी घेतलेल्या ठरावामुळे तसेच नगरपालिका प्रशासनाने व काही समाजसेवकांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही योजना मंजूर झाली आहे.हे काही आपल्या एकट्याचे श्रेय नाही, परंतु आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ही योजना मीच मंजूर करून आणली असे आ. काळे भासवत आहेत.5 नंबर साठवण तलावाचे काम अद्याप सुरू झालेले नसताना शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी 131.24 कोटीचा निधी आणल्याच्या तसेच तांत्रिक मान्यता,प्रशासकीय मान्यतेच्या नावाखाली आ.काळे हे पाणीप्रश्न सुटल्याचा आभास निर्माण करून नुसता गाजावाजा करत आहेत. खोटे पण रेटून बोलणाऱ्या आ. काळेंच्या या नाटकबाजीला आमचा विरोध आहे.131 कोटीच्या या योजनेसाठी 19 कोटीची लोकवर्गणी भरण्याची नगरपालिकेची आर्थिक कुवत नाही.5 नं.साठवण तलावाचे काम सुरू झाल्यामुळे विरोधकांची पोटदुखी वाढली आहे,या म्हणण्यात अजिबात तथ्य नाही. 5 नं.साठवण तलावाची क्षमता 4 नंबर तळ्याएवढीच आहे.5 नं. साठवण तलावामुळे शहराचा पाणीप्रश्न सुटणार नाही.या तळ्यामुळे चार ते पाच आवर्तने वाढणार असून,त्यामुळे शहराला रोज पाणी मिळेल,हे आ.काळे यांचे म्हणणे हास्यास्पद आहे. तत्कालीन न.प.मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी 5 नं.साठवण तलाव झाला तरी शहराला दररोज पाणी देता येणार नाही, असा खुलासा यापूर्वीच केलेला आहे,असे काले यांनी म्हटले आहे.

  शहरवासियांना दूषित पाणी पाजण्याचा अट्टहास कशासाठी?

हरित लवादाने गोदावरी नदीचे पाणी प्रदूषित असून,पिण्यासाठी योग्य नाही,असे शासनाच्या निदर्शनास आणून दिलेले असतानादेखील शहरवासियांच्या आरोग्यास अपायकारक असे पाणी पाजण्याचा अट्टहास आ. काळे करत आहेत.कोपरगाव शहरासह तालुक्याचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे,संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,भाजपच्या प्रदेश सचिव आणि माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मोठे योगदान दिलेले आहे.कोपरगाव नगरपालिकेच्या येसगावातील 1 ते 5 नंबरच्या साठवण तलावासाठी जागा आणि शासनाकडून निधी मिळविण्यासाठी स्व.शंकरराव कोल्हे आणि परिवाराने काय-काय प्रयत्न केले हे जनतेला चांगलेच माहीत आहे.याउलट काळे परिवाराने पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आजपर्यंत कोणतेही योगदान दिलेले नाही. समन्यायी पाणीवाटप कायद्याला माजी आमदार अशोकराव काळे यांनी दिलेली मूकसंमती आणि दारणा धरणातून येवला तालुक्यातील 40 गावांना पाणी देण्याच्या निर्णयाला आ. आशुतोष काळे यांनी विरोध न करण्याची घेतलेली भूमिका यामुळे कोपरगाव तालुक्याला हक्काचे पाणी गमवावे लागले, असा आरोप काले यांनी केला आहे.

      निळवंडे-शिर्डी-कोपरगाव बंदिस्त पाईपलाईन पाणी योजनेस खोडा घालण्याचे पाप

भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना निळवंडे धरणातून शिर्डीपर्यंत बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी आणण्याची योजना सरकारने आखली होती. कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा आणि नागरिकांना दररोज स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे,या हेतूने या योजनेत कोपरगावचा समावेश व्हावा म्हणून तत्कालीन आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून 20 जुलै 2015 रोजी निळवंडे धरणातून कोपरगावपर्यंत बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याची योजना मंजूर करवून आणली. सुमारे 260 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेसाठी कोपरगाव नगर परिषदेला एक पैसाही खर्च करावा लागणार नव्हता.या योजनेचा सर्व खर्च साईबाबा संस्थान करणार होते.या योजनेची निविदासुध्दा निघाली होती,पण काही विघ्नसंतोषी मंडळींना हाताशी धरून आ.काळे यांनी न्यायालयात याचिका दाखल करून या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला.नंतर न्यायालयाने यावरील स्थगिती उठवून सदर योजनेला मंजुरी दिली.सध्या दारणा धरणातून गोदावरी कालव्याद्वारे कोपरगावपर्यंत पाणी आणण्याची जी योजना आहे त्यात अनेक दोष असून,भविष्यकाळाचा विचार करता निळवंडे-शिर्डी-कोपरगाव ही बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याची योजना अत्यंत फायदेशीर आहे,परंतु राजकीय कृपाशीर्वादाने साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद मिळालेल्या आ. आशुतोष काळे यांनी या योजनेच्या पूर्णत्वासाठी अद्यापपर्यंत चकार शब्दही काढला नाही किंवा कार्यवाही केली नाही.कारण त्यांना कोपरगावकरांसाठी ही योजना होऊच द्यायची नाही म्हणून ते या योजनेत अडथळे आणून शहरवासियांना शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप करत आहेत,असा आरोपही काले यांनी केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!