Homeकोपरगाव“रयत शिक्षण संस्थेत आयोजित दंत आरोग्य सेमिनारची विश्वविक्रमी नोंद.”- मा श्री ....

“रयत शिक्षण संस्थेत आयोजित दंत आरोग्य सेमिनारची विश्वविक्रमी नोंद.”- मा श्री . चंद्रकांत दळवी

कोपरगाव :-“काळानुसार समाजातील ज्ञानाच्या गरजांमध्ये सातत्याने बदल होत गेले, तसेच आदरणीय शरद पवार साहेबांनी रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीला दूरदृष्टीपूर्ण आणि सकारात्मक नेतृत्व प्रदान केले. संगणक शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, जैवतंत्रज्ञान, रयत विज्ञान परिषद, राजीव गांधी सायन्स सेंटर, इनोव्हेशन अँड इन्व्हेन्शन समिती अशा विविध उपक्रमांसोबतच सर्व शाखांतील वर्गखोल्यांमध्ये इंटरनेट सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अध्यापनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व उपक्रमांद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि बदलत्या काळानुसार आवश्यक असे शिक्षण देण्याचे कार्य आपण सर्वजण आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सतत करत आहोत,” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री. चंद्रकांत दळवी यांनी केले ते रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण मा. श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्था, एस.एस.जी.एम कॉलेज कोपरगाव व कृष्णानी डेंटल केअर कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित Online Seminar And World Record Event अंतर्गत ‘दंत स्वच्छता आणि सुरक्षा’ याविषयावरील व्याख्यानात उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री. विकास देशमुख यांनी भूषविले.
अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले की, “आदरणीय पवार साहेबांचे कार्य आणि त्यांची दूरदृष्टी ही आपणा सर्वांसाठी अत्यंत मौलिक आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्वाचा व कर्तृत्वाचा व्यापक प्रसार करण्याच्या हेतूने आजच्या या व्याख्यानाचे नियोजन करण्यात आले आहे. साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाचा परंतु अनेकदा दुर्लक्षित राहणारा ‘दंत स्वच्छता आणि जागरूकता’ हा विषय आपण या विशेष व्याख्यानासाठी निवडला आहे. विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये दंत आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. तसेच, भविष्यात ‘डोळ्यांची निगा आणि सुरक्षा’ या विषयावरही मार्गदर्शनपर सेमिनार आयोजित करण्याची गरज आहे.”

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन मा. श्री. अॅड भगीरथ शिंदे यांनी आपल्या मनोगतात , “रयत शिक्षण संस्थेत दरवर्षीप्रमाणे यंदाही १२ डिसेंबर रोजी संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्र पवार साहेब यांचा वाढदिवस विविध उपक्रम आणि कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. संस्थेच्या कार्यपरंपरेनुसार प्रत्येक शाखेमध्ये तसेच संस्था पातळीवर निबंधस्पर्धा, विविध शैक्षणिक स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम आणि समाजाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.असे सांगितले.

मा. पवार साहेबांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला नवचैतन्य लाभले असून, त्यांच्या व्हिजनमुळेच रयत शिक्षण संस्था देशात डिजिटल परिवर्तनाची प्रभावी अंमलबजावणी करणारी अग्रगण्य संस्था ठरली आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवण्याची परंपरा संस्थेत कायम आहे. हे उपक्रम समाजापर्यंत संस्थेच्या प्रगतीची आणि गुणवत्तापूर्ण कार्याची माहिती पोहोचवतात.

यावर्षी या परंपरेत आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून ‘दंतनिगा व दंतस्वच्छता जागरूकता’ हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि आरोग्यदायी विषय निवडण्यात आला. दातांची योग्य निगा, दैनंदिन स्वच्छतेचे महत्त्व, अन्नपदार्थांचा दातांवर होणारा परिणाम तसेच दंत आरोग्याबाबत पसरलेल्या गैरसमजांचे निरसन करण्यासाठी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक, प्रभावी आणि समजण्यास सोपे मार्गदर्शन करण्यात आले.”

प्रमुख वक्ते डॉ. अंकित कृष्णानी यांनी“विद्यार्थ्यांना दंतस्वास्थ्याचे महत्त्व अतिशय सोप्या आणि मनोरंजक शैलीत समजावून सांगितले. सेमिनारमध्ये त्यांनी वयोवृद्ध रुग्णांचे उदाहरण देत दातांचे आयुष्यभरातील महत्त्व अधोरेखित केले. दातांची किंमत आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात किती वाढते याचे भावनिक उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना आजपासून दंतस्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. दातांच्या उपचारांचा खर्च, सरकारी दंतसेवा उपलब्धतेतील मर्यादा आणि चुकीच्या सवयींमुळे होणारे आजार, दातांचे कार्य, चावण्याची प्रक्रिया, पचनक्रिया, आणि दात नसल्यास निर्माण होणारे पोटाचे आजार याचे शास्त्रीय स्पष्टीकरण दिले. जिव्हेची रचना, तिच्यावर जमा होणारे थर, दुर्गंधीचे कारण, आणि टंग- क्लिनर चा अत्यावश्यक वापर यावरही त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी आपल्या प्रास्ताविकात “उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत करत सेमिनारचा हेतू स्पष्ट केला. ग्रामीण शिक्षणाचा प्रसार हे ज्यांच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे अशा पवार साहेबांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सदैव जाणीव असते. विद्यार्थ्यांचे दातांचे आरोग्य सुरक्षित राहावे, त्यांच्यात दंतस्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या सेमिनारचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले”. तसेच महाराष्ट्राचे समाजजीवन समृद्ध करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसानिमित्त त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

सेमिनार साठी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ. निलेश मालपुरे यांनी मानले. या सेमिनारचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सीमा दाभाडे यांनी केले.

सदर सेमिनारसाठी रयत शिक्षण संस्थेतील सर्व पदाधिकारी, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, जनरल बॉडी सदस्य, लाईफ वर्कर, लाईफ मेंबर, विभागीय चेअरमन, इन्स्पेक्टर, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आणि विद्यार्थी दूरदृश्यप्रणालीद्वारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!