Homeकोपरगाव111 गुंठे जागेवर देर्डे चांदवडमध्ये ‘ज्ञान-भक्ती संगमा’ची भव्य मुहूर्तमेढ प्रजापिता ब्रह्माकुमारीज्‌ तर्फे...

111 गुंठे जागेवर देर्डे चांदवडमध्ये ‘ज्ञान-भक्ती संगमा’ची भव्य मुहूर्तमेढ प्रजापिता ब्रह्माकुमारीज्‌ तर्फे बारा ज्योतिर्लिंग केंद्र व राजयोग मेडिटेशन सेवा केंद्रासाठी भूमिपूजन सोहळा उत्साहात

कोपरगाव : – तालुक्यातील देर्डे चांदवड येथे अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचा तेजस्वी दीप प्रज्वलित झाला आहे. प्रजापिता ब्रह्मा कुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने १११ गुंठे जागेवर साकारण्यात येणाऱ्या भव्य प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याने परिसर भक्तिमय झाला.

५१ फूट उंचीची, लांबी-रुंदीने भव्य आणि लांबूनही शिवपिंडी सारखी आकर्षित दिसणारी वास्तू येथे उभी राहणार असून, तिच्या अंतरंगात बारा ज्योतिर्लिंग (ज्ञान व भक्ती संगम) केंद्र, राजयोग मेडिटेशन सेवा केंद्र, म्युझियम व रिट्रिट सेंटर, फार्म हाऊस, गौशाळा, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, संत निवास तसेच बाग-बगीचा असा बहुआयामी प्रकल्प साकारला जाणार आहे. पुढील महाशिवरात्रीपर्यंत मंदिर पूर्णत्वास नेण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

हा मंगल सोहळा नाशिक येथील राजयोगिनी ब्रह्मा कुमारी वासंती दीदी यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात आणि राजयोग साधनेच्या पवित्र वातावरणात विधिवत पार पडला. भूमिपूजनाच्या क्षणी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या ऐतिहासिक उपक्रमाचे स्वागत केले.

समारंभास माजी पाटबंधारे मंत्री अण्णासाहेब मस्के, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कुंभारी येथील महंत राघवेश्वरानंद गिरी महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी राजयोग अभ्यास व पारंपरिक पूजन, गोमाता पूजन विधीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पाचे सामाजिक व आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, म्युझियम व रिट्रिट सेंटरमुळे परिसरात अध्यात्म, संस्कृती आणि शिक्षणाचा संगम साधला जाईल. गौशाळा, अनाथ आश्रम व वृद्धाश्रमाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना आधार मिळणार असून, हा प्रकल्प सेवाभावाचे मूर्तिमंत उदाहरण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

राजयोगिनी वासंती दीदी म्हणाल्या, “ही वास्तू केवळ विटा-मातीची उभारणी नसून मानवतेच्या जपणुकीचा, संस्कार संवर्धनाचा आणि आत्मोन्नतीचा पवित्र संकल्प आहे.” भविष्यात येथे ध्यान-योग शिबिरे, संस्कार वर्ग, युवक मार्गदर्शन उपक्रम व विविध सामाजिक सेवा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पिंडीच्या आकाराचे मंदिर; एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन…..

राजयोगिनी ब्रह्माकुमारीज सरला दीदी यांनी माहिती देताना सांगितले की, उभारण्यात येणारे मंदिर पिंडीच्या आकाराचे असून ते लांबूनही आकर्षक भासेल. या मंदिरात बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन एकाच ठिकाणी घेता येणार आहे. सर्व मूर्ती माउंट आबू पर्वतावरून आणण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथील मंदिरा नंतर कोपरगाव तालुक्यात असा वैशिष्ट्यपूर्ण, वास्तुशास्त्रानुसार, आध्यात्मिक उपक्रम साकारत असल्याचा विशेष आनंद त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास ज्ञानेश्वर माऊली महाराज, देर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. प्रतिभा गायकवाड, मढीचे सरपंच प्रवीण निंबाळकर, कोळपेवाडीच्या सरपंच सौ. चंद्रकला सूर्यभान कोळपे, सुरेगावच्या सरपंच सौ. सुमन कोळपे, सौ. शकुंतला कोल्हे, इंजिनीयर दत्ता जाधव, इंजिनीयर शैलेश आसने, देवेंद्र गवारे आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी मंत्री अण्णासाहेब मस्के यांनी मंदिरासाठी एक लाख रुपये देणगी जाहीर केली व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही आपल्या मनोगतातून शुभेच्छा व्यक्त करत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. ज्या भाविकांना दानशूर व्यक्तींना मंदिरासाठी दान द्यायचे असेल त्यांनी संदीप भोसले (७९७२६२५९५०) व बी.के. शितल दीदी (७५८८५५७३१४), तसेच कोपरगाव व देर्डे चांदवड शाखेची संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

देर्डे चांदवडच्या भूमीत रोवलेली ही ‘ज्ञान-भक्ती संगमा’ची मुहूर्तमेढ भविष्यात संपूर्ण परिसरासाठी आध्यात्मिक उर्जेचे आणि समाजसेवेचे प्रेरणास्थान ठरेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!