Homeकोपरगावजिद्द,परिश्रम आणि देशसेवेची ओढ; कोपरगावची सई सुकाळे भारतीय सैन्यात ‘लेफ्टनंट’

जिद्द,परिश्रम आणि देशसेवेची ओढ; कोपरगावची सई सुकाळे भारतीय सैन्यात ‘लेफ्टनंट’

कोपरगाव : – कोपरगावच्या भूमीतून उगवलेली जिद्द, शिस्त आणि परिश्रमांची उज्ज्वल कहाणी आता देशसेवेच्या तेजाने उजळली आहे. कोपरगावचे माजी नगराध्यक्ष बाबुराव गवारे यांची पणती आणि कै. शरदराव गवारे यांची नात असलेल्या कु. सई समीर सुकाळे हिने अथक परिश्रम, ध्येयवेडी जिद्द आणि कुटुंबीयांच्या पाठबळाच्या बळावर भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर निवड मिळवत कुटुंबासह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

“तू लढ… मी तुझ्या पाठीशी आहे!” या वडिलांच्या प्रेरणादायी शब्दांनी सईच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित केली, तर आईच्या निस्वार्थ पाठबळाने तिच्या स्वप्नांना उभारी मिळाली. या संस्कारांच्या पायावर उभी राहून सईने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत अधिकारी प्रशिक्षण अकादमी, चेन्नई येथे प्रवेश मिळवला. वर्षभराच्या खडतर प्रशिक्षणानंतर ती भारतीय सैन्यात वर्ग-एक अधिकारी – लेफ्टनंट म्हणून गौरवली गेली.

प्रशिक्षण काळात सईने केवळ शिस्त, धैर्य आणि नेतृत्वगुण दाखवले नाहीत, तर क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. विविध स्पर्धांमध्ये तिने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदके पटकावली. याशिवाय तिला ड्रिल सन्मानचिन्ह आणि मार्क्समन सन्मानचिन्ह प्राप्त झाले. तिच्या व्यक्तिमत्त्व, नेतृत्व आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत तिला “मिस ओटीए” हा मानाचा किताबही बहाल करण्यात आला.

सईच्या यशामागे तिच्या कुटुंबातील प्रेरणादायी परंपरेचा मोठा वाटा आहे. तिचे आजोबा कै. शरदराव गवारे यांनी सुमारे पन्नास वर्षांपूर्वी संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा देऊन भोपाल येथे सेवा निवड मंडळाची मुलाखत दिली होती; मात्र काही गुणांनी त्यांची निवड हुकली. आपल्या नातीने सैन्य अधिकारी व्हावे, ही त्यांची मनापासूनची इच्छा सईने पूर्ण केली. आज ते हयात नसले तरी त्यांच्या आशीर्वादानेच हे यश साकार झाल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.

आई सौ. सुवर्णा सुकाळे (शेतकरी उत्पादक कंपनी संचालिका) यांच्या संस्कारांची शिदोरी आणि वडील समीर सुकाळे (नेचर्स फ्रेश कंपनी संचालक) यांनी दिलेले स्वातंत्र्यपूर्ण वातावरण व प्रोत्साहन हे सईच्या यशाचे भक्कम आधारस्तंभ ठरले.

लहानपणापासूनच सईचा क्रीडाप्रेमी आणि जिद्दी स्वभाव दिसून येत होता. अवघ्या पाचव्या वर्षापासून तिने पोहण्याचा सराव सुरू केला. वयाच्या तेराव्या वर्षी दीर्घ अंतर पोहण्याच्या प्रकारात तिची नोंद लिम्का विक्रम नोंदवहीत झाली. दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन येथेही तिने दीर्घ अंतर पोहण्यामध्ये उल्लेखनीय विक्रम प्रस्थापित केला.

महाविद्यालयीन काळात वॉटर पोलो या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर दोन वेळा सुवर्ण व रौप्य पदके मिळवत तिने आपली छाप उमटवली. राष्ट्रीय विद्यार्थी सैन्यदलाच्या प्रशिक्षणातून ती दिल्ली येथील २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी झाली. अभ्यासाबरोबरच वादविवाद स्पर्धा, नाट्यप्रयोग, क्रीडा प्रशिक्षण, मुष्टियुद्धाचा सराव तसेच स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांतून तिचे व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम बनले.

नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेनंतर सेवा निवड मंडळ मुलाखत, मानसिक व शारीरिक चाचण्या आणि वैद्यकीय तपासणी या सर्व टप्प्यांत तिने उल्लेखनीय यश मिळवत अखेर अधिकारीपद प्राप्त केले.

दरम्यान,अधिकारी प्रशिक्षण अकादमी, चेन्नई येथे झालेल्या भव्य प्रशिक्षण समारोप संचलनात सहभागी होण्याचा सईच्या पालकांना लाभलेला क्षण अत्यंत भावूक करणारा ठरला. दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात शौर्य, साहस, शिस्त आणि देशसेवेची पराकाष्ठा अनुभवायला मिळाली. त्या वेळी पालकांना “माझे अपत्य देशाला अर्पण” असा संदेश असलेले स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.

देशभक्तीच्या सुरांनी भारलेला सैनिकी वाद्यवृंदाचा कार्यक्रम, त्यानंतरचे दिमाखदार संचलन आणि “अंतिम पग… पहिले पाऊल…” या क्षणी घडलेला ऐतिहासिक सोहळा उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू आणणारा ठरला. त्यानंतर झालेल्या खांद्यावर लेफ्टनंटचे दोन तारे लावण्याच्या सोहळ्यात सई अधिकृतपणे भारतीय सैन्याची अधिकारी बनली.

आज सईच्या या यशामुळे सुकाळे परिवाराचा आनंद गगनात मावत नाही. ही केवळ एका मुलीची यशोगाथा नसून प्रत्येक पालकाला प्रेरणा देणारा संदेश आहे. मुलांना स्वप्ने पाहू द्या, त्यांना पंख द्या; ते आकाशही जिंकून दाखवतील. देशसेवेच्या पवित्र ध्येयाने प्रेरित झालेली लेफ्टनंट सई समीर सुकाळे आज प्रत्येक मराठी मनाला अभिमानाने उंचावून ठेवत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!