
संपादक – राजेंद्र तासकर
निळवंडे धरणातून शिर्डी व कोपरगाव शहराला बंदिस्त पाईपलाईनमधून पाणीपुरवठा करण्याची योजना तसेच निळवंडे कालव्याद्वारे शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रश्न येत्या सहा महिन्यांत मार्गी लावू.आता राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले असून, कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी निळवंडे धरणातून थेट कोपरगाव पर्यंत बंदिस्त पाईपलाईनमधून पाणी आणण्याच्या योजनेला गती दिली जाईल,असे जाहीर आश्वासन राज्याचे महसूल व पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदार संघातून भाजपचाच आमदार निवडून येईल आणि आपण ही जबाबदारी घेत असल्याचे विखे पाटील यांनी यावेळी जाहीर केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभा प्रवास योजना या उपक्रमांतर्गत कोपरगाव (जि. अहमदनगर) येथील कलश मंगल कार्यालयात शनिवारी (१० सप्टेंबर) आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय जलशक्ती आणि अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल,भाजपच्या प्रदेश सचिव तथा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे,शिर्डीलोकसभा मतदारसंघाचे भाजप प्रभारी व चांदवडचे आमदार डॉ.राहुल आहेर,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,संघटनसरचिटणीस नितीन दिनकर,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेसंचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, भाजपचे प्रांतिक सदस्य रवींद्र बोरावके,भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे,दीपक चौधरी,अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान,भाजपचे कोपरगाव तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष डी.आर.काले, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे,शहराध्यक्ष अविनाश पाठक,शरद नाना थोरात,भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष वैशाली साळुंके,किरण महावीर दगडे,राजश्री कोळपकर, योगीराजसिंग परदेशी,सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव,संचालक विश्वासराव महाले,साहेबराव कदम, केशवराव भवर,वेणुनाथ बोळीज, विलास वाबळे,कानिफनाथ गुंजाळ,ज्ञानेश्वर परजणे,सतीश आव्हाड,मनेष गाडे,बापूसाहेब बाराहाते,ज्ञानेश्वर होन,बाळासाहेब वक्ते,रमेश आभाळे,ज्ञानदेव औताडे,संजय औताडे, बाळासाहेब पानगव्हाणे,कैलास माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कोपरगाव शहरास नाशिकच्या दारणा धरणातून गोदावरी डावा कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो.दारणा धरणावर पिण्याच्या पाण्याच्या जवळपास १२८ योजना सध्या कार्यान्वित आहेत. कोपरगाव शहरासाठी सध्या वार्षिक ३७५६ क्युसेक पाणी आरक्षण मंजूर असून,हे पाणी प्रत्यक्ष कोपरगाव शहरातील लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी कालवा गळती,बाष्पीभवन व इतर कारणांमुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. भविष्यात दारणा धरणातील पाण्याचे आरक्षण वाढतच जाणार आहे.त्यामुळे भविष्यात कोपरगावची वाढती गरज लक्षात घेता तेवढे पाणी मिळण्यात अडचणी येणार आहेत.गोदावरी डावा कालव्याद्वारे कोपरगावकरांना मिळणारे पाणी अतिशय दूषित असते.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.कालव्याद्वारे येणारे पाणी शुद्ध करण्यासाठी नगर परिषदेला मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च करावा लागतो. नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून,पाणीपुरवठा योजना व इतर कामांसाठी शासनाच्या नियमानुसार लोक वर्गणीचा वाटा भरण्याची नगर परिषदेची ऐपत नाही.नगर परिषदेच्या मालकीच्या येसगाव परिसरातील साठवण तलाव क्र. १ ते ४ मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्यांची पाणी साठवण क्षमता घटली आहे. ५ नंबरचा साठवण तलाव झाला तरीदेखील शहराला दररोज शुद्ध व पुरेसे पाणी पुरवणे शक्य नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागवणे कठीण होणार आहे.
या सर्व बाबी लक्षात घेऊन तत्कालीन आमदार व भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना कोपरगाव शहराला निळवंडे धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याची योजना मंजूर करवून आणली;पण काही विघ्नसंतोषी मंडळींनी अडथळा आणल्यामुळे मध्येच ही योजना रखडली आहे.आता राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले असून, कोपरगावकरांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली ही योजना तातडीने मार्गी लावण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू.या योजनेच्या अंमलबजावणीतील तांत्रिक बाबींचा अभ्यास करून येत्या सहा महिन्यांत ही योजना कार्यान्वित करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू,अशी ग्वाही विखे पाटील यांनी यावेळी दिली.
कोपरगाव मतदारसंघाचा पुढचा आमदार भाजपचाच
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातील भाजप उमेदवार स्नेहलताताई कोल्हे यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला. आता आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार विजयी होईल आणि ती आपली जबाबदारी राहील.एवढेच नव्हे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातूनसुद्धा भाजपचाच खासदार निवडून येईल.त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे,असे आवाहन विखे पाटील यांनी केले.
प्रल्हादसिंग पटेल यांचे कार्य तरुणांसाठी आदर्शवत -विवेकभैय्या कोल्हे युवा नेते विवेकभैय्या कोल्हे म्हणाले,केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल हे आजही या वयात तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने काम करीत आहेत.बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासारखे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.प्रल्हादसिंग पटेल यांचे सध्याचे वय पाहता ते या वयातही अतिशय कुशलतेने आणि तडफदारपणे काम करीत आहेत ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.पटेल यांचे कार्य तरुणांसाठी आदर्शवत असल्याचे सांगून कोल्हे यांनी पटेल यांच्या कार्याची मुक्तकंठाने स्तुती केली.केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजना, जलजीवन मिशन यासारख्या योजनांमधून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी घरकुल व पाणीपुरवठा योजनांची कामे झाली आहेत. वास्तविक ही सर्व कामे केंद्र सरकारच्या निधीतून झाली असतानादेखील स्थानिक आमदार मात्र आपल्या प्रयत्नामुळे ही कामे झाल्याचे जनतेला खोटे सांगून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे,असे म्हणत त्यांनी स्थानिक आमदारांवर निशाणा साधला.
प्रारंभी संजीवनी उद्योग समूह,कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने मंत्री प्रल्हादसिंग पटेल,राधाकृष्ण विखे पाटील,आ.डॉ.राहुल आहेर व अन्य पाहुण्यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे,उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक विश्वासराव महाले,शरद नाना थोरात,रवींद्र बोरावके आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.