

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, संजयनगर,हनुमाननगर,आयेशा कॉलनी या भागातील तीन लहान मुलांना आज सकाळी मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केले.यापूर्वीही अनेक भागातील नागरिक मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात व मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करण्यात नगर परिषद प्रशासन साफ अपयशी ठरले आहे.मात्र,नागरिकांकडून सक्तीने करवसुली केली जात आहे. नगर परिषद प्रशासनाने आधी नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,तोपर्यंत करवसुलीची गाडी शहरात फिरू देऊ नये.प्रशासनाने नागरिकांच्या जीविताशी खेळू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील,असा सज्जड इशारा भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी दिला आहे.
संजयनगर भागातील तीन लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याचे समजताच भाजप,शिवसेना व मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांना भेटून न.प.प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावरून त्यांना धारेवर धरले.
यावेळी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान,भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले,शिवसेना नेते कैलास जाधव,माजी उपनगराध्यक्ष आरिफभाई कुरेशी,माजी नगरसेवक नयनकुमार ऊर्फ बबलू वाणी,विनोद राक्षे,दिनेश कांबळे,मेहमूदभाई सय्यद,वैभव गिरमे,राजेंद्र लोखंडे,पिंकी चोपडा,अल्ताफभाई कुरेशी, खालिकभाई कुरेशी,फकीर मोहम्मद पैलवान,एस.पी.पठाण, अल्ताफभाई पठाण,रोहित कनगरे,अजितभाई तांबोळी,इम्रान हुसेन तांबोळी,तौसिफ तांबोळी,जुनेद तांबोळी,फिरोज अत्तार आदींसह भाजप,शिवसेना,आरपीआयचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर परिषद प्रशासनाने शहरातील नागरिकांना पाणी, स्वच्छता,आरोग्य,रस्ते व इतर सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात,अन्यथा नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यानेतृत्वाखाली जनआंदोलन करण्यात येईल,असा इशारा पराग संधान यांनी यावेळी दिला.
यावेळी पराग संधान म्हणाले,आज बुधवारी (१५ मार्च) सकाळी मोकाट कुत्र्यांनी हमजा जावेद अत्तार (वय३वर्षे,रा. आयेशा कॉलनी),हसनीन इम्रान तांबोळी (वय६वर्षे,रा. संजयनगर)आणि फैजल मोहसीन शेख (वय ४ वर्षे,रा. हनुमाननगर) या तीन लहान मुलांना चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे.या मुलांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.या मुलांच्या उपचारासाठी मोठा खर्च येणार असून, त्यांचे पालक मोलमजुरी करून आपले घरदार चालवतात.त्यांना हा खर्च परवडणारा नाही.शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, त्याकडे नगर परिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.त्यामुळेच आज तीन लहान मुले मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.या जखमी झालेल्या लहान मुलांच्या उपचाराचा खर्च करण्याची त्यांच्या पालकांची ऐपत नाही.त्यामुळे या मुलांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च नगरपालिका प्रशासनाने अधिकाऱ्यांच्या पगारातून किंवा ठेकेदाराकडून करावा,अशी मागणी पराग संधान यांनी केली.
पराग संधान म्हणाले,नगर परिषदेत अनागोंदी कारभार सुरू असून,प्रशासकांचा कर्मचाऱ्यांवर कसलाही वचक नाही.ठेकेदारांवरही नियंत्रण नाही.त्यामुळे कर्मचाऱ्यांची मनमानी चालू आहे.शहरात नियमित साफसफाई होत नाही.त्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे मोकाट कुत्रे,डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.तीन महिन्यांपूर्वी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जानेवारी महिन्यात न.प.मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांना भेटून शहरातील पाणी,स्वच्छता,रस्ते,आरोग्य व इतर प्रश्न मांडले होते.तीन दिवसां पूर्वी आम्ही पुन्हा एकदा त्यांना नागरिकांचे हे प्रश्न सोडविण्याची विनंती केली होती; पण त्यांनी काहीच कार्यवाही केली नाही.
शहरातील २७ हजार मालमत्ता धारकांचे चुकीचे सर्वेक्षण करणाऱ्या आर.एस.कन्स्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल करणे,साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुल्या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम दीड वर्षांपासून रखडवणाऱ्या कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करणे,रस्त्यांचे निकृष्ट व अर्धवट काम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करणे, त्यांना पेमेंट देऊ नये,शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित व घाण पाणीपुरवठा होत असून,नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना दररोज स्वच्छ पाणीपुरवठा करावा,आरोग्य सुविधा दर्जेदार पद्धतीने पुरवाव्यात आदी मागण्या आम्ही केल्या होत्या. मात्र,प्रशासनाने अद्यापही त्यावर उचित कार्यवाही केलेली नाही.या सर्व प्रश्नांवर येत्या आठ दिवसांत योग्य कार्यवाही करावी,असे निवेदन आम्ही मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांना आज दिले आहे.
शहरात साफसफाई करण्याची व नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे.याकरिता नागरिक नगरपरिषदेला दरवर्षी घरपट्टी,पाणीपट्टी,स्वच्छता कर आदी कराच्या रूपाने लाखो रुपये देत असतात.मात्र,नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात नगरपालिका प्रशासन पुरते अपयशी ठरले आहे.शहर वासियांना आठ दिवसांआड आणि तोही अतिशय घाण पाण्याचा पुरवठा होत असून,नळाद्वारे येणारे पाणी इतके अस्वच्छ आहे की,ते पाणी नागरिक पिऊ शकत नाहीत.नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात प्रशिक्षित कर्मचारी नाहीत,जलशुद्धीकरण प्रक्रियेसाठी नगरपालिका प्रशासन लाखो रुपये खर्च करते तरीही शहराला अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. याबाबत पराग संधान व इतर पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाला जाब विचारला. नगरपालिका प्रशासन जोपर्यंत नागरिकांना नियमित स्वच्छ पाणीपुरवठा,स्वच्छता,आरोग्य,रस्ते व इतर सुविधा पुरवत नाही तोपर्यंत नगरपालिकेची करवसुलीची गाडी नगरपालिकेच्या बाहेर काढू नये, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल,असा इशारा त्यांनी दिला.
