
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राची विद्यार्थिनी कु.दर्शना दत्तु पवार हिने राज्यसेवा आयोगातर्फे घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन,राजपत्रित अधिकारी वर्ग-दोन मध्ये वन परिक्षेत्र अधिकारी (रेंज फॉरेस्ट ऑफिसर) म्हणून यश संपादन केले आहे.या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये सातवा क्रमांक येऊन तिला हा बहुमान प्राप्त झाला आहे.
तिच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर. सानप यांच्या शुभहस्ते आणि उपप्राचार्य डॉ.एस.बी.रणधीर, डॉ.अर्जुन भागवत,प्रा.अरुण देशमुख,स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा.संजय गायकवाड,अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. बंडेराव तऱ्हाळ,गणित विभागप्रमुख प्रा.उत्तम गवळी,प्रा.सुरेश भागवत,प्रा.तेजस होन आणि प्रा.शितल कदम यांच्या उपस्थितीत दि.३ एप्रिल २०२३ रोजी तिचा नुकताच सत्कार करण्यात आला.
कु.दर्शना पवार हिने महाविद्यालया मधून २०१८ साली गणित विषयात बी.एस्सी.पदवी प्राप्त केली आहे.तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून २०२० ला गणित विषयात पदुत्तर पदवी प्राप्त केली आहे.सदर विद्यार्थिनीची आई गृहिणी व वडील वाहनचालक असून अतिशय सामान्य कौटुंबिक परिस्थितीतून तिने हे यश संपादन केले आहे.आपल्या या यशाचे श्रेय तिने आपल्या आई वडिलांबरोबर आपला भाऊ आणि गुरुजन यांना दिले आहे.
दर्शना पवार हिने मिळविलेल्या या उत्तुंग यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांनी तिचेमनःपूर्वक अभिनंदन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवल्याबद्दल तिला धन्यवाद दिले आहेत.तसेच तिच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.