Homeकोपरगावअष्टावधानी जेष्ठपत्रकार -कै.स.म. कुलकर्णी.

अष्टावधानी जेष्ठपत्रकार -कै.स.म. कुलकर्णी.

मुख्य संपादक – राजेंद्र तासकर

कोपरगाव :-पुर्वीच्या काळी पत्रकारीता करणं म्हणजे आव्हान होतं. आताची प्रगत आणि क्षणात संदर्भ उपलब्ध होणारी साधनं नसतानाही वर्तमानपत्रात बातमी छापून आणणं दिव्य काम होतं.अभासी जग (सोशल मिडीया) फारसं अस्तित्वात नव्हतं.विश्वासार्हता बातमीचा पाया होता.या सगळ्यातून साक्षेपी संपादक,चाणाक्ष पत्रकारितेची नजर हेरुन काम करून जनभावनेसह,स्थानिक राजकीय नेतृत्वाला न दुखावता पुढे जायचं हे कसब ठराविक जणांना अवगत होत असतं.

कोपरगांव सारख्या ग्रामिण भागात त्याकाळी पत्रकारितेची बिजं रोवायची आणि आपल्याबरोबच परिसराच्या सर्वांगिण प्रगतीसाठी काम करीत राहणं हे हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच पत्रकारांना जमत होते.त्यात स्व.शं.पा.कपिले,स्व.तुकाराम बाळाजी ऊर्फ टी.बी.मंडलिक,स्व.सी.बी गंगवाल,स्व.अशोक खांबेकर,स्व.भास्कर जोशी,सुरेश रासकर,सी.डी. वाघ, यांच्याबरोबरच एक हक्काच नांव म्हणजे कै.स.म.ऊर्फ सदाशिव महिपती कुलकर्णी होय.

त्यांचा जन्म १९३४ मध्ये श्रीरामपुर तालुक्यातील खैरी या गांवी ब्राम्हण कुटुंबांत झाला.त्यांचे आजोबा स्व. यशवंत बाजीराव कुलकर्णी हे साईबाबांच्या शिर्डीत शाळा मास्तर होते तर वडील स्वःमहिपती यशवंत कुलकर्णी हे पाटबंधारे (जलसंपदा) खात्यात मोजनीदार म्हणुन नौकरीस होते.वडीलांनी अतिशय प्रतिकूल परिस्थीतीत कुटुं‌बाला घड‌विले.पुढे कै. स.म.कुलकर्णी यांनी शिक्षण पुर्ण करून पत्रकारिता क्षेत्रात पदार्पन केले.

वडील महाराष्ट्र शासनांच्या पाटबंधारे खात्यात नौकरीस असल्यांने त्यांच्या ओळखीने पाटबंधारे खात्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या ओळखी बरोबर त्यांचा नित्याचा संबंध आला.पत्रकारिते बरोबरच समाजकारण करत त्यांनी श्रीरामपूर,राहाता,कोपरगांव,वैजापुर सह नाशिक जिल्ह‌यातील शेती पाटपाण्याच्या प्रश्नांना -चालना देत वर्तमानपत्रातून आवाज उठवून अनेक रखडलेली धरणे,कालवे,चाऱ्या,उप चाऱ्यची कामे मार्गों लावली.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्री साईबाबा संस्थान (शिर्डी) कोपरगांव पासून १६ किलोमिटर अंतरावर असल्यांने कै.स. म.कुलकर्णी यांचा साई संस्थानशी नित्याचा संबंध होता.कोपरगांवच्या राजकारणात माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांचा दबदबा होता.त्यांच्या राजकीय जडणघडणीत कोपरगांव तालुक्यातील सर्वच पत्रकारांबरोबर कै.स.म.कुलकर्णी यांचेही विशेष योगदान होते.

माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी शेती,पाणी आणि शेतकरी या तीन घटकांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विविध आंदोलनांना वर्तमान पत्रातून प्रसिद्धी देण्यासाठी कै.स.म. कुलकर्णी यांनी प्रामाणिकपणे साथ दिली.स्व शंकरराव कोल्हे यांनी गोदावरी खोऱ्यातील प्रलंबीत धरणे, गोदावरी कालवे नुतणीकरण,मुकणे धरण,भाम-भावली,वाकी,मुकणे उंचीवाढ,निळवंडे धरण त्याचे कालवे,नांदुरमध्यमेश्वर जलद कालवा, अस्तरीकरण,चारी नंबर एक आणि दोन,ग्रामीण टेलच्या भागात शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नसे म्हणून त्यासाठी करावा लागणारा संघर्ष आदि कित्येक प्रश्नात पत्रकार कै.स.म.कुलकर्णी यांनी लेखनीतून काम करत शेतकऱ्यांच्या जीवनांत समृद्धी आणण्यांत मोलाची भूमिका बजावली.

स्वःशंकरराव कोल्हे यांना बहुतांष गोष्टी अधिकारवाणीने सांगुन त्या पुढे नेण्यांत ते कार्यरत असायचे.सिने अभिनेते तत्कालीन खासदार स्व.सुनिल दत्त यांनी शांती यात्रा काढली होती.ती कोपरगांव रेल्वे स्थानकावरून मार्गक्रमण होत असतांना कै.स.म.कुलकर्णी यांनी सर्व पत्रकारांना एकत्र करत त्यांच्याशी साधलेला वार्तालाप अजुनही स्मरणांत आहे.

महाराष्ट्रभूषण शिवचरित्रकार स्व.बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासकालीन गड,कोट,किल्ले याची स.म.कुलकर्णी यांना आवड होती,फावल्यावेळेत त्यांनी शिवकालीन इतिहास ठेव्याला भेट देत त्याचे संदर्भही जाणून घेतले आहे.

कै.स.म कुलकर्णी यांनी शेती आणि पाणी गोदावरी खोऱ्यातील ज्वलंत बनलेला पाणीप्रश्न,खंडकरी, शेतकऱ्यांचे प्रश्न,कोपरगावविधानसभा मतदारसंघाचे प्रश्न यावर जनजागृती केली त्याचा परिपाक म्हणून त्यांना पत्रमहर्षि बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

नवोदित पत्रकारांना नव-नविन गोष्टी शिकायला मिळाव्या ही त्यांची आवड होती.तत्कालीन महसूलमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी पुणे पत्रकार संघाबरोबरच कोपरगांव तालुका पत्रकार संघाला शासकीय मदतनिधी मंजुर करून पत्रकार भवन उभारण्यास मोठी मदतही केली होती.

माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी त्यांचे आत्मचरित्र सत्याग्रही शेतकरी नावांने लिहीले त्याच्या पुणे येथील प्रकाशन समारंभाला ते उपस्थित होते. साहित्यीक राम शेवाळकर,हवामान तज्ञ वसंतराव गोवारीकर यांच्या उपस्थीतीत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास (संजीवनी सहकारी साखर कारखाना) २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संपादक अरुण खोरे,स्व.कन्हैया कुंदप,स्व.सुधाकर जोशी,स्व.सी.बी.गंगवाल,स्व. भास्कर जोशी,स्व.अशोक खांबेकर,स्व.शंकरराव कपिले,स्व.तु‌काराम मंडलीक,आदिनी संजीवनी रौप्य महोत्सवी ग्रंथ निर्मितीत साथ दिली त्याचा पाया कै.स.म.कुलकर्णी यांनी रचला होता.

पत्रकारिता आणि समाज माध्यमातील कितीतरी नामांकित व्यक्तींशी त्यांचा नेहमीच संवाद असायचा.आता पत्रकारितेची जागा अभासी तंत्रज्ञानाने घेतली आहे पण पाहिजे तेव्हढी विश्वासार्हता मुद्रण माध्यमांप्रमाणे त्यात दिसत नाही ही खंत आहे.निवडणुका राजकारण आणि समाजकारण यांतून पुढे जात प्रश्न सोडवायचे ही हातोटी त्यांना अवगत होती.शेवटपर्यंत साधी राहणी स.म.यांनी सोडली नाही.सायकल आणि त्याला छोटीशी अडवलेली पिशवी अशा वेषात कै.स.म.कुलकर्णी आयुष्यभर वावरले.वृध्दापकाळात त्यांनी असाध्य आजारावर मात केली. त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती,समाधानी वृत्ती ठेवत त्यांनी नव्वदी गाठली होती.आयुष्यभर मधुमेह आजाराशी सामना केला.संजिवनी व सोमय्या उद्योग समूहाशी त्यांचा निकटचा संबंध होता.

मात्र एप्रिल २०२४ च्या मध्यावधीत ते रात्री झोपेतून उठले त्यांना चक्कर आली ते जमीनीवर कोसळले त्यातच त्यांचा खूबा मोडला.चिरंजीव सतीष व किरण यांनी त्यांना तात्काळ जपे रुग्णालयात भरती केले,आरोग्याची सुश्रुषा सांभाळली याहि परिस्थीतीत त्यांना होणाऱ्या वेदना दुर कराव्या म्हणून नाशिक येथील डॉ.अनिकेत जोशी यांच्याकरवी त्यांच्या खुब्यावर शस्त्रक्रिया केली,ती ही चांगली झाली,पण वयोमानापुढे प्रकृतीला हार पत्करावी लागली आणि,२४ एप्रिल २०२४ रोजी पहाटे त्यांचे निधन झाले. निधनानंतर अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील विविध राजकीय, अराज‌कीय,आजी माजी सनदी अधिकाऱ्यांनी कुलकर्णी परिवाराचे सांत्वन केले,आमचे मित्र,साथीदार, सगळ्या आठवणी आमच्या जवळ ठेवून देवाघरी गेले,हीच त्यांना शब्द सुमनांची श्रद्धांजली !

मा.मच्छिंद्र पा.टेके,
माजी सभापती,कोपरगाव तालुका पंचायत समिती,कोपरगाव.(वारी – कान्हेगाव)

दशक्रियाविधी ३ मे २०२४ सकाळी ८.३० वाजता,अमरधाम,कोपरगाव गोदातीरी येथे होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!