
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – ” घागर उशाला अनं कोरड घशाला ” या युक्तीप्रमाणे गोदावरी नदीला पुर येऊन नदी दुथड़ी भरून वाहत आहे व कॅनलला पाणी चालू असल्यामुळे नगरपालिकेने आता तरी शहराचा पिण्याचा पाणीपुरवठा ४ दिवसआड पूर्ववत करावा अशी मागणी माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगरपालिकेला केली आहे.

नगरपालिका नदी,कॅनलद्वारे वाहुन जाणारे पाणी कोपरगाव शहर वासियांना पिण्यासाठी का ? देऊ शकत नाही असा खोचक सवाल करत, महिलांची पाण्यासाठीची होणारी तारांबळ नगरपालिका प्रशासन पाणी दिवस कमी करून कधी थांबवणार ?असा प्रश्न श्री.पाटील यांनी या माध्यमातून उपस्थित केला आहे.
नगरपालिकेच्या फिल्टरेशन प्लांटला इंडस्ट्रीची एक्सप्रेस फीडर लाईन असून देखील पाण्याची टाकी भरली नाही या नावाखाली किती किती तास वेळेवर पाणी न सोडता महिलांना ताटकळत ठेवतात त्याचबरोबर पाणी सोडण्यात वेळेचा बदल होत असल्यास त्या भागातील वॉलमन ने फिरून तेथील नागरिकांना पाण्याची येण्याची वेळ कळवली पाहिजे.
उन्हाळ्यात धरणांमध्ये पाणी नाही हे कारण सांगून १३ ते १४ दिवसाआड पाणीपुरवठा कोपरगाव शहरातील नागरिकांना नगरपालिकेने केला. आणि आता तर नदीला चालू पावसाळ्यातला दुसरा पूर आलाय आणि कॅनल सुद्धा भरभरून वाहत आहे,तरी सुद्धा नगरपालिका जनतेला ४ दिवसाआड पाणीपुरवठा पूर्ववत का ? करू शकत नाही.याचा अर्थ नगरपालिका प्रशासन जाणून बुजुन जनतेला वेठीस धरते की काय ?जनतेकडून पाणी दिवस कमी करायची मागणी केल्याशिवाय नगरपरिषद प्रशासन पाणी दिवस पूर्ववत चार दिवसाआड का करत नाही ? ही खेदाची बाब असून. पाण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीकडे नगरपरिषदेने गांभीर्याने विचार करावा अशी विनंती केली असून,ज्यामुळे शहरातील महिलांचे मोठ्या प्रमाणात तारांबळ होऊन हाल होत आहे.
पाणी साठवून ठेवण्यासाठी झोपडपट्टी भागात लोक पातेल्यांमध्ये, घागरीमध्ये पाणी साचवतात आणि दुसरीकडे नगरपालिका सांगते की पाणी साठवून ठेवू नका डेंग्यूचे डास तयार होतात आणि दुसऱ्या बाजूला नगरपालिका पाणी दिवस कमी करायचा गांभीर्याने विचार करायला तयार नाही.एकीकडे खूप डासांचा त्रास आणि दुसरीकडे आठ दिवसात पाणी असा लपंडाव खेळुन नगरपालिकेने नागरिकांच्या जीवाशी हे खेळायचे काम चालू केले आहे अशी खरमरीत टीका माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी प्रशासनावर केली आहे.
जर नागरिक नगरपालिकेला पूर्ण पाणीपट्टी भरून देखील सुद्धा नागरिकांना वेळेवर स्वच्छ पाणी पिण्यासाठी नगरपालिका का देत नाही याचा खुलासा नगरपालिकेने केला पाहिजे असेही श्री.पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
आता तर नदीला पूर आलाय,कॅनल चालू आहे.तरी नगरपालिकेने ४ दिवसाआड तात्काळ पाणीपूरवठा पूर्ववत करून स्वच्छ पाणी पुरवठा नागरिकांना करावा अशी विनंती शेवटी माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी केली आहे.