
तक्रारीची दखल घेऊन पणन विभागाने दिले आदेश
कोपरगाव : – कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सचिवांनी अनेक नियमबाह्य कामे केली आहेत.अनेक बाबीत बाजार समितीची फसवणूक केल्याचा आरोप करत कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथील काँग्रेस किसान सेलचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सुधाकर जाधव यांनी बाजार समितीमधील गैरव्यवहाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पणनमंत्र्याकडे निवेदन देऊन केली आहे. दखल न घेतल्यास १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशीआत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनात दिला होता. त्यानंतर पणनं संचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

निवदेनात पुढे विजय सुधाकर जाधव यांनी म्हटले आहे,की कोपरगाव बाजार समितीत सचिवांनी अनेक कामे नियमबाह्य करून बाजार समितीची फसवणूक झाली आहे. कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे कौटुंबिक शपथपत्र न घेता, काही कर्मचाऱ्यांचे तीन अपत्य असताना देखील नियमांचे उल्लंघन करत कामांवर ठेवले आहे. वृत्तपत्रात जाहिरात न देता, पणन संचालक यांची परवानगी न घेता नातेवाइकाला कामावर घेतलेले आहे. राजकीय अस्तित्व वाढवण्यासाठी पदावर असतानाही स्वतःच्या मुलाचे बाजार समितीचा परवाना घेऊन मतदान केले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून बाजार समितीत पदाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांनाच कामांवर घेतले. शिरसगाव-तिळवणी उपनबाजारचे टेंडर ३८ टक्के कमी दराची निविदा प्रकरण, संचालक मंडळ अस्तित्वात आल्यावर बिले व वाढीव पगार काढणे, माहिती अधिकारात माहिती विचारली तर चुकीची माहिती देणे,असे प्रकार आहेत. या सर्व प्रकाराची खातेनिहाय चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अन्यथा १ मे रोजी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पणन संचलनालयाच्या जिल्हा उपनिबंधकांनी सर्व मुद्द्यांबाबत चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जाधव यांनी दिली.