
कोपरगाव🪐 दि. २७ एप्रिल :आरोग्य भवन येथे नुकतीच आरोग्य मंत्री डॉ प्रकाश आबीटकर यांच्या मार्गदर्शना खाली अवयव प्रत्यारोपण विषयी बैठक पार पडली या बैठकीमध्ये त्यांनी अवयवदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबवून जनतेत अवयवदाना विषयी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे डॉ.अशोक गावित्रे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे कि, एक मे रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरावर जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अवयव दाते आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच अवयवदात्या बरोबरच नेत्रदान त्वचादान व देहदान करणाऱ्या कुटुंबीयांचा देखील या दिवशी सन्मान करण्यात यावा,अशी मागणी साईबाबा संस्थानचे साईनाथ नेत्र पिढीचे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर तसेच नेत्रदान अवयवदान व देहदान समूपदेशक डॉक्टर अशोक गावित्रे यांनी आरोग्य मंत्री यांच्याकडे केली असून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयाच्या ठिकाणी डोनर वॉल तयार करण्याची देखील मागणी त्यांनी यावेळी लेखी स्वरूपात आरोग्य मंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली असून, त्यांच्यासोबत फोनवर देखील सकारात्मक चर्चा झाली असल्याचे डॉ. गावित्रे यांनी यावेळी सांगितले.

राज्यामध्ये नेत्रदानाची चळवळ व्यापक स्वरूपात सुरू असून नेत्रदान करण्यासाठी बऱ्यापैकी लोक पुढे येऊ लागले आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी येते अवयवदान सुलभ व्हावे यासाठी नाशिक, अमरावती, कोल्हापूर सोलापूर येथे नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वयक केंद्र स्थापन होणार असून यामुळे अवयवदान करणे सोपे होणार आहे. नेत्रदान, अवयवदान ,देहदान ही काळाची गरज असून याविषयी जनजागृती होणे खूप गरजेचे असून लोकांचे याविषयी असणाऱ्या अंधश्रद्धा तसेच गैरसमज दूर झाल्यास याचे प्रमाण निश्चितच वाढेल. आजही अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत असून कित्येकांचा मृत्यू हा अवयव न मिळाल्यामुळे होत आहे एका व्यक्तीच्या अवयवादानामुळे सात लोकांना जीवनदान मिळू शकते यासाठी या जनजागृती कार्यक्रमामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील साईबाबा संस्थानचे साईनाथ नेत्र पिढीचे ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर तसेच नेत्रदान अवयवदान व देहदान समूपदेशक डॉक्टर अशोक गावित्रे यांनी केले आहे.