
कोपरगाव 🪐ता. २ मे : – खूप दिवसांनी साहित्यासाठी अहोरात्र ध्यास घेतलेल्या एक साहित्यवेडा प्रमोद येवले यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगांव तालुका शब्दगंध साहित्य परिषदेने ठेवलेल्या कविसंमेलनाचा प्रमुख पाहुणा म्हणून अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर कोपरगांव येथे जाण्याचा योग आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून साहित्यिका श्रीमती रजनीताई गुजराथी, राष्ट्र सेवा दल ग्रंथालयाच्या ट्रस्टी सौ.शोभनाताई ठोळे व आजचे वाढदिवसाचे उत्सवमूर्ती प्रमोद येवले हे होते.
प्रमोद येवले हा शब्दगंध साहित्यिक परिषदेवर जिवापाड प्रेम करणारा साहित्यिक. हा साहित्यिक असा की दररोज किमान एकाला तरी साहित्याविषयी गोडी लावण्याचा ध्यास घेतलेला साहित्यिक.उदाहरणच द्यायचे ठरले तर कोर्टासारख्या रुक्ष वातावरणात कधी साहित्य फुलेल का? पण तिथे ही या माणसाने चिकाटी सोडली नाही. येथील महिला कर्मचारी सौ. शीतल देशमुख यांना अतिशय अदबशीरपणे बोलून साहित्याची गोडी लावली. एव्हढेच नव्हे तर त्यांच्या मुलांनाही ग्रंथालयात येऊन नवीन पिढीला लिहिते वाचते करण्याचा त्याचा हा छंद या काळात तर विरळच आहे. नुसते लिहिते वाचते केले नाही तर त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने कविसंमेलनास यावयास भाग पाडले. हे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
कोपरगांवला साहित्यिक परंपरा खूप मोठी आहे. माधव थोरात, मंसाराम वंजी पाटील, डॉ. दादासाहेब गलांडे, प्रा. सिताराम गोसावी, कै. प्रा. कन्हैया कुंदप, न्या. बनसोडे, कै. प्रा. अनिल सोनार, प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे आदी लेखकांनी साहित्य विश्वात मोलाची भर घातली आहे. 30 एप्रिल चा दिवस म्हणजे कोपरगांवकर कवीसाठी साहित्य पंढरीचा दिवस होता.
या दिवशी कै.डॉ. सतीश चिमणलाल मेहता हे आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सन १९८२-८३ च्या आधी पासून पुढे दहा वर्षे दुपारी 3 ते 4 वाजलेपासून ते रात्रभर कवितेचा जागर करत असत. यावेळी या कविसंमेलनात नामवंत कवी, साहित्यिक यांनी हजेरी लावली आहे. यात प्रख्यात कवी रामदास फुटाणे, विठ्ठल वाघ, नारायण सुमंत, शंकर पाटील, प्रशांत होळकर, प्रकाश घोडके, कमलाकर देसले, द. भा. धामणस्कर, गुजराथी, प्राध्या.रायभान दवंगे, डॉ. नजीर शेख,तसेच कल्याण, पुणे , मुंबई येथील अनेक कवींनी या कविसंमेलनात हजेरी लावली आहे. या कवींच्या कविता ऐकून येथील कवी राजेंद्र कोयटे , हेमचंद्र भवर, प्राध्या. दादासाहेब कोते, प्राध्या. शशिकांत शिंदे, हिरालाल महानुभाव, कै. श्रीराम फडके, कवयत्री प्रतिभा औटी व अनेक कवींच्या प्रतिभा जागृत झाल्या. पुढे डॉक्टर मेहता यांच्या जाण्याने ही सर्वांना हवीहवीशी वाटणारी यादिवशीची कविसंमेलनाची परंपरा खंडित झाली. परंतु कवी प्रमोद येवले यांच्या वाढदिवसानिमित्त आज याच तारखेस ठेवलेले कविसंमेलनाच्या निमित्ताने ही आठवण आल्याचे मत हेमचंद्र भवर यांनी व्यक्त केले.
यानंतर राजेंद्र कोयटे म्हणाले की, ही कविसंमेलनाची परंपरा विविध प्रसंगाच्या निमित्ताने चालवण्याचा प्रयत्न आम्ही अनेक वेळा केला. परंतु प्रमोद असेल तर त्याच्या सततच्या प्रयत्नाने अनेक वेळा कवीसंमेलनास गर्दी होत असे.त्यांचे शालेय जीवनातील सहकारी मित्र श्री.अशोक आव्हाटे यांनी आज आम्ही साहित्यिक म्हणून आहोत ते केवळ प्रमोदमुळेच हे सांगितले.खरा प्रमोद हा फक्त साहित्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून अगदी तुटपुंज्या पगारावर येथे ग्रंथालयात काम करून आपली गुजराण करतो. इतर वेळी पेपर लाइन टाक, पापड व अगरबत्ती, धूप, सुगंधी ऊटणे आणि प्रासंगिक वस्तू विकून, होमगार्डची तातडीच्या वेळची नोकरी करत, असे इतर छोटे मोठे काम करून प्रपंच करण्याचा प्रयत्न करतो. साहित्याप्रती असलेली त्याची तळमळ आणि मनापासूनची उलघाल पाहून त्याची पत्नी हेमलता वाहिनी या खर तर त्याचा हा घरप्रपंच पापड तयार करून विकून त्यावर संसाराचा गाडा चालवतात. खऱ्या अर्थाने या माऊलीचे साहित्यावर उपकार आहे की कुटुंबाची जबाबदारी सर्वात जास्त या माऊलीने स्वतः वर घेऊन तिने प्रमोदला साहित्यसेवेचा छंद जोपासण्यास मोकळीक दिली.या ही परिस्थितीत या माऊलीने काटकसर करून एक मुलगी व एक मुलगा यांना इंजिनिअर बनवले आहे.
आता काही दिवसांपूर्वी प्रमोदच्या डोळ्याला मार लागला, दिसणे कमी झाले, प्रमोदचे बाहेर निघणे कमी झाले. मित्र श्री. अशोकराव व सहकारी श्री. योगेश कोळगे यांनी घरी जाऊन प्रमोदला घराबाहेर काढले. परंतु प्रमोदने सत्य परिस्थिती सांगितली की दवाखान्याचा खर्च करायला पैसे नाही. मात्र सर्व मित्र, साहित्यिक, कोपरगांवकर जनतेने त्याचा औषधपाण्याचा खर्च केला. इतका परिस्थितीने कफल्लक असलेला प्रमोद मात्र जनतेला साहित्याच्या प्रवाहात आणण्यासाठी किती ध्यास घेतो आहे. हे मला आज त्याच्या दोन्ही बाजूने कळले.
आमच्या शब्दगंध साहित्य संमेलनात दरवर्षी न चुकता प्रमोद येतो. पुस्तक स्टॉलची जबाबदारी सांभाळतो. लोकांना पुस्तके घेण्यासाठी प्रवृत्त करतो. स्टॉलमधूनच प्रत्येक वक्त्यांचे विचार ऐकतो. आणि नंतर त्याच अनुभवाच्या जोरावर लिखाण, कविता करतो. संमेलनात भेट देणारे साहित्यिक, साहित्य रसिक यांना वाचन संस्कृतीत जोडण्याची त्याची धडपड चालू असते त्यावेळी आम्ही इतर पदाधिकारी मात्र स्टेजवरील मान्यवरांचे सत्कार समारंभात मग्न असतो. संमेलन संपल्यानंतर आलेला प्रमोद सुनील गोसावी यांच्या ताब्यात ग्रंथसंपदा देऊन निघून ही गेलेला असतो. या काव्यसंमेलनाच्या निमित्ताने प्रमोदचा आणखी एक सद्गुण म्हणा किंवा राष्ट्रभक्ती म्हणा ती समजली ती अशी की दररोज पहाटे प्रमोद सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला भेट देऊन पाहणी करून येतो सुरक्षा, गावाची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करतो.
शब्दगंध साहित्यिक परिवारात नेवासा शाखेने तालुक्यात फिरते वाचनालय काढून प्रत्येक गावात जाऊन पारावार, गर्दीच्या ठिकाणी जाऊन तेथे पुस्तके मांडून संबळच्या आवाजाने गर्दी गोळा करून जनतेला, मुलांना , पेन्शनरांना पुस्तके वाचावयास देतात व लोकांना वाचते करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोपरगांव तालुका शाखेच्या वतीने एकटा प्रमोद मात्र व्यक्तीची ओळख होताच त्याला, त्याचा मुलाबाळांना साहित्याची गोडी वाढविण्याचा ध्यास घेतो. सर्वतोपरी प्रयत्न करतो. अनेक वर्षापासून त्याची ही तपश्चर्या चालू असल्याचे आज समजले. कोपरगांव तालुक्यात शब्दगंध साहित्यिक परिषदेची शाखा स्थापन करण्यापासून ते सतत नवीन नवीन साहित्यिक जोडण्यात, नवीन कार्यकारिणी निवडण्यात प्रमोदचा फार मोठा वाटा आहे. आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे प्रपंचाची काळजी न करता लोकांना लिहिते वाचते करण्यासाठी वेळ घालविणारा आमचा भोळाभाबडा प्रमोद साहित्याच्या पुरस्कारासाठी याच्या इतका लायक व्यक्ती सापडणे हे दुर्मीळच आहे.
प्रमोदच्या आजच्या या कविसंमेलनात कविता सादर करण्यासाठी राजेंद्र कोयटे, हेमचंद्र भवर, कैलास साळगट, अनिकेत देशमुख, बाबा वायखिंडे, योगेश कोळगे, अशोक आव्हाटे, गणेश वैद्य, जगन्नाथ तुपे, स्वाती मुळे, शैलजा रोहोम, शीतल देशमुख, यांनी हजेरी लावली.
58 व्या वर्षात पदार्पण करण्यासाठी त्याला परमेश्वर भरपूर आरोग्यमय आयुष्य देवो. व त्याच्या शब्दाने अजूनही वाचक वर्ग वाढावा अशी सदिच्छा व्यक्त करून त्याला शब्दगंध साहित्यिक परिवाराकडून शुभेछ्या देतो.
शब्दांकन – राजेंद्र फंड, प्रसिद्धी प्रमुख