
कोपरगाव :कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी ‘साम- दाम – दंड – भेद’ या सूत्राचा अवलंब करत विजय मिळवला असला, तरी आता त्यांनी निव्वळ ‘पोस्टर बॉईज’ न ठरता शहराचा सर्वांगीण विकास करून दाखवावा, अशा शब्दांत कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्ताधाऱ्यांना चिमटा काढत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
सत्तेचा पूर्ण वापर आणि पक्षांतर: या निवडणुकीत सत्तेचा आणि पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. दुर्दैवाने, काँग्रेसच्या शहराध्यक्षाला ऐनवेळी ‘ए बी’ फॉर्मसह भाजपमध्ये प्रवेश देऊन लोकशाही मूल्यांची पायमल्ली करण्यात आली. आता केंद्र, राज्य आणि कोपरगाव नगरपालिका अशा तिन्ही स्तरांवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. त्यामुळे निवडणुकीत मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे आता सत्ताधाऱ्यांना सहज शक्य आहे. त्यांनी शहराच्या प्रलंबित प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्या. काळे-कोल्हे या प्रस्थापितांच्या संघर्षात अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांचा राजकीय बळी गेला आहे. साखर कारखाना आणि विधानसभेच्या वेळी हे प्रस्थापित स्वार्थासाठी एकत्र येतात, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळी कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी निर्माण करण्यासाठी एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात, हे कोपरगावच्या जनतेने ओळखले आहे.
जिल्हा परिषद-पंचायत समितीवर परिणाम नाही: शहरातले आणि ग्रामीण भागातील प्रश्न पूर्णपणे भिन्न आहेत. त्यामुळे या निकालाचा आगामी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही.शेतकरी प्रश्नांवर महाविकास आघाडी कायम ठाम असणार ,युती सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्याचे आणि कर्जमुक्तीचे आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही. ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये असलेला हा असंतोष आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचा मार्ग मोकळा करेल, असा विश्वास काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन मनोहर शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
शेवटी, नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांनी कोपरगावच्या विकासासाठी कटिबद्ध राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.