
कोपरगांव: – तालुक्यातील श्री श्री श्री १००८ धर्मनिष्ठ, राजगुरू, अनंत विभूषित, महाराष्ट्र पिठाधिश्वर, महामंडलेश्वर, दत्तात्रेयरत्न महान तपस्वी सदगुरू स्वामी शिवानंदगिरी महाराज यांच्या कृपाप्रेरणेने पावन झालेल्या धर्मपीठ श्रीक्षेत्र मंजुर येथे महाशिवरात्र उत्सवानिमीत्त सालाबादप्रमाणे याही वर्षी अखंड पंचमहायाग सप्ताहाचे ९ ते १६ फेब्रुवारी पर्यंत आयोजन करण्यांत आले आहे. सप्ताहाचे हे सत्ताविसावे वर्ष आहे. याचकाळात शिवनामजप रूद्रचंडीयाग, सामुदायीक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होत आहे.
श्रीक्षेत्र मंजुर येथील भूमि संत शाहिर परसराम महाराज व गणेशगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे. या सर्व कार्यक्रमांस तालुक्यातील सर्व क्षेत्रातील भाविक तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सहकार आदि क्षेत्रातील विविध मान्यवर आजी माजी लोकप्रतिनिधी विविध शासकीय निमशासकीय कार्यालयांचे अधिकारी पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
रूद्रचंडी यागाची सांगता १६ फेब्रुवारी रोजी महामंडलेश्वर शिवानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता तर दत्त संस्थान देवगडचे उत्तराधिकारी महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनांने होणार आहे. त्रंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ वारकरी शिक्षण संस्था निलपर्वत येथील शिक्षक, विद्यार्थी वृंद व मंजुर पंचक्रोशीतील सर्व भाविक आदिंचे विशेष सहकार्य मिळत आहे. तर महाशिवरात्रदिनी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ९ या काळात सिध्देश्वर रूद्राभिषेक व निशानपुजा, त्यानंतर मुकुट मिरवणुक तर दुपारी ४ वाजता स्वामी शिवानंदगिरी महाराज यांचे जाहिर प्रवचन होईल.
सालाबादप्रमाणे याही वर्षी हभप रमेशानंदगिरीजी महाराज (९ फेब्रुवारी) हभप संदिप महाराज खंडागळे (१० फेब्रुवारी) हभप श्रीराम महाराज बोचरे (११ फेब्रुवारी) हभप हभप महंत योगीराज दादा महाराज कृष्णा महाराज हारदे (१२ फेब्रुवारी) (१३ फेब्रुवारी) हभप आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर (१४ फेब्रुवारी), हभप लक्ष्मण महाराज नांगरे (१५ फेब्रुवारी) यांचे रात्रौ ७ ते ९ या काळात किर्तनाचे आयोजन केले आहे. आचार्य वेदमुर्ती स्वप्नील सुनिल कुलकर्णी (कारवाडी), वेदशास्त्रसंपन्न अभिजितदादा सोहळे, आदित्य गुरूजी (त्रंबकेश्वर), शर्माजी शास्त्री (वाराणशी), सुनिल बापूराव जोशी (सुरेगांव), सुधाकर कुलकर्णी गुरूजी (कोळपेवाडी) हे महारूद्र व सहस्त्रचंडी महायागाचे आचार्य असणार आहेत. तर व्यासपिठ चालक हभप सुधाकर महाराज आहेर हे मदत करणार आहेत. या संपुर्ण सप्ताहकाळात त्रिकाल आरती होईल, तरी भाविकांनी या सर्व धार्मीक कार्यकमाचा लाभ घेवुन मोठया संख्येने उपस्थित रहावे व सढळहातांने मदत करावी असे आवाहन सिध्देश्वर देवस्थान ट्रस्ट मंजूरच्या वतीने करण्यांत आले आहे.