
कोपरगाव : – शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये उणीव राहुन त्याचा शालेय विद्यार्थ्यांवर प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष शैक्षणीकदृष्ट्या परिणाम होऊ नये यासाठी “माझा गाव माझी शाळा माझी जबाबदारी ” या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत तालुक्यातील कुंभारी येथील रयत शिक्षण संस्थेच्या गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयाच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत शाळेस विविध भौतिक सुविधा भेट दिल्या. विद्यालयाच्या माजी विद्यार्थी युवा मंचच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांकडून देणगी संकलित करून शाळेच्या विकासासाठी गेल्या दोन वर्षापासून विकासकार्य हाती घेतले आहे.यामध्ये शाळेतील स्टेज दुरुस्ती ३० हजार रुपये, आरो फिल्टर प्लांट १ लाख ५० हजार रुपये, एका माजी विद्यार्थिनींकडून २५ हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे, तर एका माजी विद्यार्थ्याकडून सीसीटीव्ही स्क्रीन भेट देण्यात आली. तसेच शाळेच्या कमानीचे रंगकाम व पेंटिंग १५ हजार रुपये त्याचबरोबर विशेष म्हणजे शाळेसाठी ८५ हजार रुपये किमतीची अत्याधुनिक साऊंड सिस्टिम देण्यात आली असून त्यामुळे विद्यालयाच्या सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांना नवी ऊर्जा मिळणार आहे.
भौतिक सुविधांबरोबरच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व व्यक्तिमत्त्व विकासावरही माजी विद्यार्थी विशेष भर देत आहेत. नियमितपणे गेस्ट लेक्चर, तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स व आत्मविश्वास वाढविण्यासाठी व्याख्याने आयोजित केली जातात. याच अनुषंगाने यावर्षी प्रो. विजय बनकर सर यांचे प्रेरणादायी व्याख्याने व करिअर आणि प्रोत्साहनपर मार्गदर्शन वेळोवेळी करण्यात येते.
माझा गाव माझी शाळा माझी जबाबदारी या भावनेतून माजी विद्यार्थी एकत्र येऊन पुढाकार घेण्यात आला त्यास ग्रामस्थ, माजी विद्यार्थी – विद्यार्थिनींचे आर्थिक योगदान मोठ्या प्रमाणात मिळत आहे त्यामुळे अनेक कामे मार्गी लागली आहे.
आज साऊंड सिस्टिमचा संच सर्व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विद्यालयाचे मुख्याध्यापक बागुल डी.एन व शिक्षक वृंद यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्त करण्यात आला. या आधुनिक साऊंड सिस्टिममुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी बोलताना मुख्याध्यापक व शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रम, परिपाठ व विविध शालेय उपक्रमांसाठी या उपकरणांची नितांत गरज होती, असे नमूद करत माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी माजी विद्यार्थ्यांनी इतर माजी विद्यार्थ्यांनाही शाळेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कुंभारी गावातील ही शाळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी आहे. जिल्हा व तालुका क्रीडा क्षेत्रात व इतर परीक्षेत विद्यार्थी गुणवत्तेत चमकत आहे. पालक नेहमी ध्येय व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असतात. बोरवेलद्वारे पाणीपुरवठा व सोलर प्लांट उभारणीसह विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही माजी विद्यार्थ्यांनी यावेळी स्पष्ट केले.