
कोपरगाव : – थोर विचारवंत, बुद्धीमान, शुरवीर, पराक्रमी कुलस्वामीनी आई तुळजा भवानी मातेच्या आशिर्वादाने व माँसाहेब जिजाऊ मातेच्या सात्विक विचारांची प्रेरणा घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन आठरा पगड जातींना एकसंघ करून दिन – दलित, वंचित, शोषीत, पीडीत, अन्यायी व अत्याचारीतांना न्याय देण्याचा मार्ग स्वीकारणारे रयतेचे रक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव कुंभारी आश्रमाचे मठाधिपती श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास ब्राम्हण वृंदांच्या मंत्रोच्चारात दुग्ध अभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांस पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. राघवेश्वर सेवा समिती कुंभारी यांच्यावतीने खंडोबा महाराज प्रांगणात भव्य दिव्य स्वरूपात व शिवमय वातावरणात शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आला.

यावेळी कुंभारी आश्रमाचे मठाधिपती श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांनी भगवान श्रीकृष्ण,प्रभू श्रीराम व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपापले अवतार कार्य पूर्ण करतांना भावी पिढीला दिलेल्या शिकवणी, प्रेरणा, कर्म व कार्य कर्तृत्व कसे असावे याबद्दल अनेक उदाहरणे देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कुमारी वैष्णवी कबाडी हिने स्व- रक्षणासाठी लाठी – काठीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात शाळेतील विद्यार्थीनींनीसह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

राघवेश्वर सेवा समितीचे अध्यक्ष सतिषभाऊ कदम व मित्र परिवाराच्यावतीने सुंदर असे नियोजन करून माँ साहेब जिजाऊंच्या भूमीकेत आरती वाघ व शिवबांच्या भूमीकेत परेश जाधव यांनी हुबेहुब उत्तम अशी भूमीका पार पाडली. जणु काही छत्रपती शिवाजी महाराज कुंभारी नगरी मध्ये प्रकट झाले की काय असे उपस्थितांना भासू लागले. सगकीकडे शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
सदर कार्यक्रमासाठी कुंभारी सह पंचक्रोशितील शिवभक्त महिला -भगिनी, बालगोपाल व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी राघवेश्वर सेवा समितीच्या वतीने उपस्थित शिव भक्तांना अल्पोपहार देण्यात आला.