
कोपरगाव : – भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 20 फेब्रुवारी (शुक्रवार )रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रेणुकाताई कोल्हे उपस्थित होत्या. तसेच एडवोकेट जयंत जोशी, बिल्डर प्रसाद नाईक सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. कैलाश ठोळे, सचिव श्री. दिलीप अजमेरे, सहसचिव श्री. सचिन अजमेरे, खजिनदार श्री. आनंद ठोळे तसेच सदस्य डॉक्टर अमोल अजमेरे श्री. राजेश ठोळे श्री. संदीपजी अजमेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्वागतगीताने करण्यात आले. पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर पाहुण्यांचे स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापक श्री मकरंद निमोणकर यांनी प्रस्ताविकातून शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीचा आढावा मांडला व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
यानंतर पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आणि इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली.
यावेळी शाळेचे डायरेक्टर श्री. राजेश ठोळे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता जीवनातील मूल्ये आत्मसात करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी.” त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा मिळाली.
एडवोकेट जयंत जोशी यांनी आपल्या भाषणात शाळेचे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये अतिशय सुयोग्य समन्वय असल्यामुळेच हा कार्यक्रम उत्तम झाला असल्याचे प्रतिपादन केले व शाळेत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रसाद नाईक यांनी पालकांना मुलांचा कल कुठे आहे याचा विचार करून त्या दृष्टीने मुलांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली. तसेच सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
रेणुकाताई कोल्हे यांनी आपल्या भाषणात शाळेचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्व प्रतिपादित केले. तसेच भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मीडियम स्कूल कशी चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी काम करत आहे सांगून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ. श्वेता भोपळे व सौ. मेघा फरताळे यांनी केले. नर्सरी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकली. नृत्य, नाटिका, लोकनृत्य सादरीकरणे आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कलाकृतींना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच रंगमंच व्यवस्था, सजावट, ध्वनी व्यवस्था आणि नृत्यदिग्दर्शक यांचेही विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्याध्यापिका सौ. वर्षा आगरकर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. अशा प्रकारे उत्साहपूर्ण वातावरणात स्नेहसंमेलनाचा समारोप झाला.