
कोपरगाव :- कोपरगाव येथील सोमय्या विद्याविहार शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे माजी प्राचार्य, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ जयंत पर्वतराव ताकवले (वय ९४) यांचे पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी पुण्यातील जोशी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा विनीत व मुलगी यामिनी असा परिवार आहे.
शिक्षण क्षेत्रात दूरदृष्टी आणि निष्ठेची परंपरा जपणारे ताकवले सर हे कोपरगाव तालुक्यासाठी प्रेरणास्थान होते. एप्रिल १९७४ मध्ये शारदा एज्युकेशन सोसायटीची माजी आमदार मोहनराव गाडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली, शारदा इंग्लिश मीडियम स्कूलची काले मळा येथे पहिली बॅच सुरू करून रोपटे रुजवले त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचे दरवाजे उघडले. त्या काळात इंग्रजी शिक्षण दुर्मिळ असताना त्यांनी घेतलेले हे धाडसी पाऊल आजही अनेकांच्या स्मरणात आहे. तसेच त्यांनी फादरवाडी भागात पहिले होस्टेलही काढले होते.
शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य म्हणून जवळपास दहा वर्षे त्यांनी अत्यंत सक्षमपणे कारभार पाहिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थी घडले, ज्यांनी विविध क्षेत्रात यश संपादन केले. त्यांच्या शिकवणीची शिस्त, अभ्यासातील काटेकोरपणा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम यामुळे ते सर्वांच्या मनात घर करून राहिले होते.विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वी ते प्रताप जगताप यांच्या मुलीच्या विवाहासाठी शिर्डी येथे उपस्थित होते. मात्र वृद्धापकाळामुळे प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यात दाखल करण्यात आले आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, गोदावरी बायो रिफायनरीचे समीर सोमय्या, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे, आदींनी शोक व्यक्त केला.
गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, सचिन कोल्हे, सुधाकर शिंदे, भाऊसाहेब शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि माजी विद्यार्थ्यांनी ताकवले सरांच्या जाण्याने कोपरगावच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक आधारवड कोसळला असून, त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे अशी प्रतिक्रिया अनेक माजी विद्यार्थ्यांनी दिली.