HomeUncategorizedराष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अनुषंगाने टी.वाय. बी.एस्सी. (भौतिकशास्त्र) अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात संपन्न

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अनुषंगाने टी.वाय. बी.एस्सी. (भौतिकशास्त्र) अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात संपन्न

कोपरगाव :- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळ, महाविद्यालयाचा भौतिकशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (NEP-2020) अनुषंगाने टी. वाय. बी. एस्सी. (भौतिकशास्त्र) अभ्यासक्रम पुनर्रचनेवरील एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पंडित शेळके उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. संदीप वर्पे होते.

कार्यशाळेच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी प्रास्ताविक व स्वागत करताना “बदलत्या काळानुसार उच्च शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, प्रकल्पाधारित अध्ययन, कौशल्याधारित शिक्षण आणि रोजगाराभिमुख घटकांचा अभ्यासक्रमात समावेश करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले”. सहभागी प्राध्यापकांच्या सूचना आणि अनुभवांमुळे अभ्यासक्रम अधिक परिणामकारक, विद्यार्थीकेंद्री आणि गुणवत्तापूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी, “नवीन अभ्यासक्रमात कौशल्यविकास, संशोधन, प्रात्यक्षिके, प्रकल्पाधारित अध्ययन, नवोपक्रम आणि रोजगारक्षमतेवर विशेष भर देण्यात आल्याचे सांगितले. कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांकडून प्राप्त सूचनांचा विचार करून अंतिम अभ्यासक्रम निश्चित करण्यात येईल”, असे त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲड. संदीप वर्पे यांनी, “विद्यार्थीकेंद्री, गुणवत्तापूर्ण आणि काळाच्या गरजांशी सुसंगत शिक्षणासाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य करण्यासाठी अभ्यासक्रम सातत्याने अद्ययावत राहणे आवश्यक आहे,” असे त्यांनी प्रतिपादन केले.

तांत्रिक सत्रात प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते यांनी, “जनरल फिजिक्स हा भौतिकशास्त्राचा मूलभूत पाया असून बदलत्या शैक्षणिक गरजा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून त्याचा अभ्यासक्रम अधिक संकल्पनाधारित, प्रयोगशील, संशोधनाभिमुख व कौशल्याधारित करण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन केले. त्यानंतर डॉ. रमेश भिसे आणि डॉ. शिवाजी भोसले यांनी, “टी.वाय. बी.एस्सी. (भौतिकशास्त्र) अभ्यासक्रमाची रचना, उद्दिष्टे, श्रेयांक (Credits), मूल्यमापन पद्धती तसेच अध्यापनातील अपेक्षित बदलांचे सविस्तर विवेचन केले.”. डॉ. रामनाथ पवार आणि डॉ. अनिल गर्जे यांनी नवीन अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या मुक्त चर्चासत्रात सहभागी प्राध्यापकांनी अभ्यासक्रमातील विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करून उपयुक्त सूचना मांडल्या. या सूचनांच्या आधारे अभ्यासक्रम अधिक दर्जेदार, परिणामकारक आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक गरजांशी सुसंगत करण्यावर भर देण्यात आला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्टांनुसार तयार होणारा अभ्यासक्रम सहभागी प्राध्यापकांच्या सूचना व अनुभवांमुळे अधिक गुणवत्तापूर्ण,
परिणामकारक आणि विद्यार्थीकेंद्रित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यशाळेस पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील प्राचार्य, विभागप्रमुख, भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक तसेच अभ्यास मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती पाटील व प्रा. पी. बी. जामदार यांनी केले, तर आभार प्रा. ए. आर. कदम यांनी मानले.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, डॉ. अर्जुन भागवत, डॉ. घनश्याम भगत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. निलेश मालपुरे, भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. मोहनसिंग पाडवी, प्रा. एस. एस. अदोणे, प्रा. ए. आर. कदम, सौ. एफ. एस. मुलाणी, सौ. बी. के. पाचपिंड तसेच कार्यालय अधीक्षक श्री. सुनील गोसावी यांचे विशेष सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!