
आमदारांचे जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष; जलसंपदा मंत्र्यांकडे अधिक पाण्यासाठी आग्रह धरण्याची मागणी
कोपरगाव: महाराष्ट्र शासनाने नुकतेच पाणी वाटपाबाबत एक नवीन परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाच्या अनुषंगाने तालुक्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेने प्रशासनाकडे आपल्या हरकती नोंदवणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून वैतरणेचे वाढलेले अतिरिक्त पाणी कोपरगाव आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील जनतेला लाभदायी ठरेल, असे आवाहन कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन मनोहर शिंदे यांनी केले आहे.
एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिंदे यांनी म्हटले आहे की, सध्याचे जलसंपदा मंत्री हे अहिल्यानगर जिल्ह्यातीलच असल्याने हे काम अधिक सोपे आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाचे स्थानिक युवा नेते आणि आमदार सध्या आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रीपदाच्या शर्यतीत मश्गुल आहेत. प्रस्थापित घराणेशाहीत वाढलेल्या या नेत्यांचे सामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
जमीन धारणा किमान – कमाल मर्यादा (सीलिंग) कायद्याचा मोठा फटका पूर्वी कोपरगाव व राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहन केला आहे, याचा कदाचित सध्याच्या लोकप्रतिनिधींना विसर पडला असावा, असा टोलाही त्यांनी लगावला. श्री नितीन शिंदे यांनी या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीची माहिती देताना सांगितले की, २०२२ मध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सह्याद्रीच्या पश्चिम घाट माथ्यावरून अरबी समुद्रात वाहून जाणारे पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी पूर्वेकडे गोदावरी नदीत वळवण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली होती. या कामासाठी मविआ सरकारने १०८ कोटी रुपये वर्ग केले होते. सुरुवातीला १ टी एम सी आणि टप्प्याटप्प्याने सॅडल डॅमद्वारे १६ टीएमसीपर्यंत पाणी वळवण्याचे नियोजन तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले होते.
सुमारे २० वर्षांपूर्वी या प्रकल्पास मान्यता मिळाली होती व अवघ्या ५ कोटींची तरतूद होती. अनेक अडचणींवर मात करत तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प मार्गी लावला. या प्रकल्पामुळे गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून निघणार असून, याचा थेट फायदा मराठवाडा, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याला होणार आहे.
ऐन उन्हाळ्यात समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागत असे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत होते. मात्र, भविष्यात पावसाळ्यातील १६ टीएमसी पाणी वळवल्यामुळे जायकवाडीची तहान भागात असतानाच, स्थानिक शेतकऱ्यांवरही अन्याय होणार नाही.
शासन परिपत्रकानुसार, पाणी वाटपाच्या मुद्यावर सत्ताधारी नेत्यांनी जनतेला हरकती घेण्यासाठी जागृत करणे व जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून तालुक्यासाठी अधिक पाणी पदरात पाडून घेणे गरजेचे आहे. मात्र, नेते वैयक्तिक राजकारणात व्यस्त असल्याने काँग्रेस पक्ष जनतेच्या हक्कासाठी मैदानात उतरला आहे.
यावेळी प्रेस नोट जारी करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास पंडोरे पैलवान, हशमभाई पटेल, सचिन होन, विजय सुधाकर जाधव, विष्णू पाडेकर, ज्ञानेश्वर भगत, राहुल गवळी, सोमनाथ पगारे, सोपान धेणक, सुभाष रणधीर, रौनक अजमेरे, पुष्पाताई भगत, राजुभाई पठाण, महादेव नाना जगताप, बाळासाहेब शिंदे, मयुर आव्हाड, ॲड. सौ. शीतल देशमुख, मझर शेख, चंद्रहार जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.