
कोपरगाव : – वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि वास्तुविशारद क्षेत्रात करिअर घडविण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने CET, NEET आणि JEE इंटिग्रेटेड कोर्सेस सुरू करून स्पर्धातमक प्रवेश परीक्षेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नियमित शिक्षणासोबत प्रवेश परीक्षांची दर्जेदार व परिणामकारक तयारी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा एस. एस. जी. एम. महाविद्यालयाचा हा अभिनव उपक्रम आहे.

याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तार्किक विचारशक्ती, विश्लेषण क्षमता आणि आत्मविश्वास विकसित करून त्यांना स्पर्धात्मक युगासाठी सक्षम बनविणे, हे या इंटिग्रेटेड कोर्सेसचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अकरावी-बारावीच्या नियमित अभ्यासक्रमासोबत CET, NEET आणि JEE परीक्षांची नियोजनबद्ध तयारी करून विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुविशारद तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी सक्षम केले जाणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महानगरांप्रमाणे गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण त्यांच्या परिसरातच उपलब्ध व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.”
या अभ्यासक्रमांतर्गत CET, NEET आणि JEE परीक्षांच्या अद्ययावत अभ्यासक्रमानुसार अध्यापन करण्यात येणार असून संकल्पनाधारित शिक्षण, अनुभवी व विषयतज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, नियमित टेस्ट सिरीज, शंकानिरसन सत्रे, वैयक्तिक मार्गदर्शन, सातत्यपूर्ण मूल्यमापन आणि स्पर्धात्मक वातावरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
महाविद्यालयात अत्यंत माफक शुल्कात हे इंटिग्रेटेड कोर्सेस उपलब्ध असून अकरावी व बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेणारे तसेच CET, NEET आणि JEE परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाची संधी न दवडता त्वरित प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.