
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब व मा.अजितदादा पवार साहेब यांनी सरकार स्थापन करताच गोरगरिबांसाठी अंत्योदय,बीपीएल कार्ड धारकांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याची घोषणा करून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आली. परंतु,त्यात होणारा गैरव्यवहार / काळाबाजार रोखण्याचे नियोजन करण्यात आले नाही.
गोरगरिबांसाठी शासन मोठया प्रमाणात स्वस्त धान्य दुकानात अन्नधान्य पुरवठा करीत आहे परंतु, ते धान्य खरोखर लाभार्थ्यांपर्यंत पूर्ण क्षमतेने पोहचते का ?त्यात गैरव्यवहार होतो यासाठी त्याची देखरेख करणारी प्रणाली निष्क्रिय असल्याची बाब कोपरगाव तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्त्याच्या निदर्शनास आली असल्याने त्यांनी हि बाब मान. तहसिलदार साहेब यांना १५ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे कळविले परंतु, त्यावर योग्य कार्यवाही झाली नसल्याने सामाजिक कार्यकर्ते व टायगर फोर्स जिल्हाध्यक्ष माहेगाव देशमुख येथील नवनाथ वाघ,सा.का.प्रकाश शिंदे -कारवाडी,सा.का.मच्छिद्र वाळुज- कोकमठाण यांनी दि.२२ सप्टेंबर २०२३ रोजी तहसिल कार्यालयासमोर बोंबा मारो आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले.या आंदोलनास अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.यामध्ये शासनाने कोपरगाव शहर व तालुक्यातील धान्य गोडाऊन व प्रत्येक रेशन वाटप दुकानास सीसीटीव्ही यंत्रणा बसवून ते तहसिल कार्यालयास ऑनलाईन चोवीस तास निगडीत ठेवण्यात यावे त्याचबरोबर, रेशन वाटप दुकानाचे थम मशीन योग्य क्षमतेचे देण्यात येऊन नागरिकांच्या हालअपेष्टा थांबवाव्या व प्रत्येकाला धान्याची पावती देण्यात यावी यासह आदि मागण्यांबाबत मा.तहसिलदार साहेब यांनी वरीष्ठ कार्यालयास कळविले असल्याची सकारात्मक चर्चा करून आंदोलन थांबवण्यात आले असल्याचे नवनाथ वाघ व त्यांचे सहकारी यांनी शेवटी सांगितले.