
कोपरगांव : – संतांच्या सेवेकरीता परमेश्वरांने चोपदाराचा अवतार धारण केला. अध्यात्माला कधीही प्रपंचाच्या चष्यातुन पाहु नका. कथा, किर्तन निरूपणांतुन परमेश्वरी भाव जागृत होतो. ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांनी कोकमठाण पंचक्रोशीसह सर्व भाविकांना अध्यात्माची उर्जा देत भक्तीमार्ग शिकविला असे प्रतिपादन आचार्य डॉ. शुभम कांडेकर यांनी केले.

तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांच्या ३६ व्या त्रितपपुर्ती पुण्यतिथी सोहळयाची सांगता काल्याच्या किर्तनांने करण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी रामदासीबाबा भक्त मंडळाच्यावतीने शरद थोरात यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राजमाता जिजाउ, स्वामी विवेकानंद जयंतीनिमीत्त विनम्र अभिवादन करण्यांत आले.
समर्थभक्त प्रसादबुवा रामदासी महाराज याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, जेथे शब्द संपतात तेथुन पुढे परमेश्वरी भाव अंतःकरणात प्रवेश करतो. ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांच्या स्थानावर दरवर्षी नित्यनियमांने साजरा होणारा पुण्यतिथी सोहळा अलौकीक आहे. आत्मा मालिक ध्यानपिठाचे प्रमुख परमानंद महाराज याप्रसंगी बोलतांना म्हणांले की, संतांनी उपासनेचा मार्ग दाखविला आहे. कुठलाही सप्ताह हा ईश्वरी सानिध्याच्या बीजाचे अंकुरण होय. भगवंत नेहमीच भक्तीची मशागत करत असतो. सनातन संस्कृतीत जीवनदात्याला प्रत्येकांने ओळखावे त्यासाठीच मनुष्य जन्म तुम्हां आम्हांला लाभला आहे. निरंजन आखाडयाचे ठाणाधिपती भगवतानंदगिरी महाराज म्हणांले की, ब्रम्हलिन संत रामदासी महाराज मन अंतःकरणाचा अमुल्य ठेवा आहे. कोपरगांव तालुका स्वयंसहायता महिला बचतगटाच्या अध्यक्षा सौ. रेणुका विवेक कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाल्या की, ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांनी तप- योगसाधनेतुन अध्यात्माचा बोध सर्वांना दिला. प्रत्येक माता-भगिनीने आपल्यातच जिजाउला पहावे आणि मुला मुलींवर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मरक्षक संभाजी महाराज यांचे विचार रूजवत सुराज्यासह स्वराज्य घडवावे.
याप्रसंगी सातारा जिल्हयातील समर्थ वासुदेव स्वामी कण्हेरी मठाधिपती प्रसाद गोसावी, सदस्य किशोर जोशी, हभप रामदास महाराज वाघ, सुर्यकांत महाराज वाघ, बबन महाराज, व्यासपीठ चालक हभप तुकाराम महाराज वेलजाळे, तबलावादक संदिप महाराज वैद्य, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, सेवानिवृत्त शिक्षक रंगनाथ किसन डहाळे, गायनाचार्य अरूणभैय्या पगारे यांच्यासह अहिल्यानगर पंचक्रोशीतील भाविक, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, संत महंत मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी मसालेभात बुदी, घुगरीचा महाप्रसाद वितरीत करण्यांत आला.