
कोपरगाव :- सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान अंतर्गत साऊ एकल महिला समितीने तालुक्यातील एकल महिलांचे हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ पंचायत समितीच्या हॉलमध्ये आयोजित केला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी साहेब यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून केले.

एकल महिलांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना म्हणाले की, महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन पुढे यायला हवे. स्वतः मधला आत्मविश्वास व नेतृत्व क्षमता विकसित करायला हव्या. उमेद च्या माध्यमातून महिलांनी स्वयंसहाय्यता गट तयार करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यायला हवा. जास्तीत जास्त स्वयंसहाय्यता गट महिलांनी तयार करावेत. योग्य त्या प्रशिक्षणाची व्यवस्था महिलांची केली जाईल.
प्रास्ताविकात संस्थेच्या अध्यक्षा संगीता मालकर म्हणाल्या की, सालाबादप्रमाणे याही वर्षी एकल महिलांचा हळदी कुंकवाचा समारंभ अतिशय उत्साहाने व आनंदाने घेत आहोत दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन हळदी कुंकवाचे वाण वाटप करतो. कधी आरोग्याचे वाण, कधी मनोरंजनाचे वाण तर कधी उद्योग व्यवसायाचे वाण. कपाळावर कुंकू लावून घेताना महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद हा शब्दांच्या पलीकडे असतो.
त्याचप्रमाणे उमेद च्या तालुका व्यवस्थापक मनीषा पाटील मॅडम यांनी स्वयंसहायता गट कसे तयार करावेत त्याची ऑनलाईन नोंदणी कशी करावी आयडी कसा मिळवावा, दशसूत्री ग्रामसंघ प्रभाग संघ, खेळते भांडवल बीज भांडवल, सबसिडी शेतकरी उत्पादक कंपनी यावर सखोल मार्गदर्शन केले. ज्या गोष्टींची आवड कौशल्य कष्ट करण्याची जिद्द ज्या महिलांमध्ये आहे त्यांनी स्वतःच्या आवडीचा व्यवसाय निवडावा व त्यात उत्तम प्रॉडक्ट बनवावे, उमेद च्या माध्यमातून उमेद मार्ट मधून मार्केटिंगची व्यवस्था देखील उपलब्ध करून दिलेली आहे. पाणी फाउंडेशन व उमेद तसेच महिलांनी गट पद्धतीने शेती कशी करायची सेंद्रिय शेती यावर सखोल चर्चा केली.
सी डी पी ओ पंडित वाघिरे यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केले. लाभाच्या योजना सांगितल्या. महिलांनी देखील चर्चेत सहभागी होऊन काही शंका उपस्थित केल्या त्यांच्या शंकांचे समाधान देखील केले गेले. वैयक्तिक लाभाच्या योजनांवर देखील चर्चा झाली. ग्रामीण महिलांसाठी आर्थिक स्वयं रोजगाराची, गरिबी कमी करणारी सामाजिक जागरूकता वाढविणारी उमेद ची योजना आहे. जास्तीत जास्त महिलांनी उमेद ला जोडून घ्यावे. निश्चितच महिलांचे त्यातून आर्थिक प्रगती होईल. महिलांना हळदीकुंकू देऊन रोजगाराच्या निर्मिती सोबतच त्यांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून गुळाच्या भेलीचे वाटप लिओनेस क्लब तर्फे करण्यात आले.
प्रसंगी क्लबच्या अध्यक्षा सोनाली गिरमे, वर्षा झंवर, सिटी पोलीस स्टेशनच्या पीएसआय नंदा गलांडे, उमाताई वहाडणे, विद्याताई भोईर, सुनिता ससाने, छाया गिरमे, गीताताई रासकर, स्मिता पोळ, अर्चना पाटील, स्वाती घुगे, स्वाती काळे आदी मान्यवर उपस्थित होते.